भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा दणदणीत विजय, दीड लाखांच्या फरकाने भाजप-सपाचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 18:41 IST2024-06-04T18:41:13+5:302024-06-04T18:41:31+5:30
चंद्रशेखर आझाद यांनी नगीना मतदारसंघात 512552 मते मिळवली.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा दणदणीत विजय, दीड लाखांच्या फरकाने भाजप-सपाचा पराभव
UP Lok Sabha Election Results 2024: उत्तर प्रदेशच्या नगीना लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. येथे भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) उमेदवार चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे ओम कुमार, सपाचे मनोज कुमार आणि बसपचे सुरेंद्र पाल सिंह होते. सपा, बसपा आणि भाजप उमेदवाराचा पराभव करुन चंद्रशेखर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
चंद्रशेखर आझाद यांना नगीना मतदारसंघात एकूण 512552 मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ओम कुमार यांना 361079, समाजवादी पक्षाचे उमेदवार मनोज कुमार यांना 102374 आणि बसपाचे सुरेंद्र पाल सिंह यांना 13272 मते मिळाली. म्हणजेच, चंद्रशेखर यांनी ही जागा 151473 मतांनी जिंकली आहे.
विजयानंतर काय म्हणाले चंद्रशेखर ?
चंद्रशेखर आझाद यांनी नगीना मतदारसंघातून दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ज्यांनी मला आशीर्वाद दिला त्या नगिनाच्या लोकांचे मी आभार मानतो. माझ्या विरोधात अपप्रचार करणाऱ्यांचेही मला आभार मानायचे आहेत.
दरम्यान, 2014 मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती तर 2019 मध्ये सपा-बसपा युतीचे उमेदवार गिरीश चंद्र यांनी हा मतदारसंघ काबीज केला होता. चंद्रशेखर आझाद इंडिया आघाडीत सामील होतील, अशी अटकळ यापूर्वी वर्तवली जात होती. मात्र त्यांनी एकट्याने निवडणूक लढवून सर्व मोठ्या पक्षांना मोठा धक्का दिला.