म्हणून वाराणसी येथून लढवली नाही लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांनी सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 14:07 IST2019-04-28T14:06:03+5:302019-04-28T14:07:16+5:30
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

म्हणून वाराणसी येथून लढवली नाही लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांनी सांगितले कारण
नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. तेव्हापासून प्रियंका गांधी यांनी वारणसी येथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, वाराणसी येथून निवडणूक का लढवणली नाही याचे कारण प्रियंका गांधी यांनी दिले आहे. माझ्या खांद्यावर संपूर्ण उत्तर प्रदेशमधील प्रचाराची जबाबदारी आहे. एका नाही तर 41 मतदारसंघात पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे एका ठिकाणी राहून मला हे शक्य होणार नाही, असे प्रियंका गांधी म्हटले आहे.
28 मार्च रोजी रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी या गेल्या असता कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती त्यांना केली. त्यावेळी निवडणूक लढवायची तर मी वाराणसी येथून लढवू का असा प्रतिप्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला होता. ही चर्चा अनौपचारिक स्वरूपाची होती. मात्र त्यानंतर प्रियंका गांधी या खरोखरच वाराणसी येथून निवडणूक लढवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तसेच प्रियंकांनी वाराणसी येथून निवडणूक लढवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान उभे राहील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती.
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते आमदार दीपक सिंह यांनी प्रियंका गांधी या वाराणसी येथून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित असल्याचा दावा केला होता. प्रियंका गांधींनी वाराणसी येथून निवडणूक लढवण्याचे ठरवले असून, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया एक दोन दिवसांत सुरू होईल, असा दावा केला होता. तसेच प्रियंका गांधीही आपण मोदींविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे वारंवार सांगत होत्या. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही प्रियका गांधी निवडणूक लढण्यास तयास असल्याचा दावा करत होता. मात्र या सर्व शक्यतांना पूर्णविराम देताना काँग्रेसने वाराणसी येथून अजय राय यांना उमेदवारी दिली.