नेत्यांसाठी कलाकार उतरले मैदानात; प्रचारासाठी मागणी वाढली, सर्व पक्षांचा अभिनेत्यांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 08:14 AM2024-04-05T08:14:59+5:302024-04-05T08:16:21+5:30

Tamil Nadu Lok Sabha Election 2024: तामिळनाडू राज्यातील ३९ जागांसाठी प्रचाराचे रण तापू लागले आहे. या वेळच्या निवडणुकीत राज्यात कलाकारांवर प्रचाराचा भार जास्त असेल, अशी चिन्हे आहेत.

Tamil Nadu Lok Sabha Election 2024: Actors step into the fray for leaders; Demand for campaigning increased, with all parties focusing on actors | नेत्यांसाठी कलाकार उतरले मैदानात; प्रचारासाठी मागणी वाढली, सर्व पक्षांचा अभिनेत्यांवर भर

नेत्यांसाठी कलाकार उतरले मैदानात; प्रचारासाठी मागणी वाढली, सर्व पक्षांचा अभिनेत्यांवर भर

- असिफ कुरणे
चेन्नई - तामिळनाडू राज्यातील ३९ जागांसाठी प्रचाराचे रण तापू लागले आहे. या वेळच्या निवडणुकीत राज्यात कलाकारांवर प्रचाराचा भार जास्त असेल, अशी चिन्हे आहेत. कमल हसन, आर. सरथकुमार, व्ही. चंद्रशेखर सारखे अभिनेते प्रचारात उतरणार आहेत. अभिनेता व द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन हे द्रमुकचे स्टार प्रचारक असून त्यांनी प्रचाराच्या दोन फेऱ्यादेखील पूर्ण केल्या आहेत.

भाजपने विरुदूनगर मतदारसंघातून अभिनेत्री राधिका यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्या टीव्ही मालिकांमधून तामिळ महिलांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला होईल, असा पक्षाला विश्वास आहे. अभिनेता सरथकुमार व त्यांची पत्नी भाजपसाठी प्रचार करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन हे द्रमुक व त्यांच्या मित्रपक्षांसाठी (काँग्रेस वगळता) राज्यभरात प्रचार करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते व्ही. चंद्रशेखर देखील द्रमुकसाठी मैदानात असतील. दिग्दर्शक टी. राजेंद्र व कॉमेडियन सुरी देखील द्रमुकसाठी प्रचार करत आहेत. 

कलाकारांचा प्रभाव अधिक
अण्णाद्रमुकने लोकसभेसाठी कलाकारांची यादी थोडी कमी केली असली तरी त्यांच्यासाठी अभिनेत्री विद्या यांच्यावर प्रचाराचा भार असेल.
शेवटच्या टप्प्यात कलाकारांचा झंझावात आणखी वाढेल. तामिळी जनतेत कलाकारांचा जास्त प्रभाव असल्यामुळे सर्वच उमेदवार कलाकारांना प्रचारात आणत आहेत.

सर्वच मतदारसंघातून मागणी
- राज्यातील सर्वच मतदारसंघांत प्रचार, रोड शो करण्यासाठी कलाकार, कॉमेडियन पाठवा अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. 
- सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची अभिनेत्यांसाठी आग्रही भूमिका आहे. 
- कलाकारांचा मतदारांवर मोठा प्रभाव पडतो. 
- त्यामुळे प्रचारात कलाकार हवाच, असा कार्यकर्त्यांचा नेत्यांकडे आग्रह आहे.

अभिनेता विजय प्रचारापासून लांब
प्रसिद्ध तामिळ अभिनेता विजय याने आपला स्वत:चा पक्ष तामिळगा वेटरी कळघम (टीव्हीके) स्थापन केला असून २०२६ ची विधानसभा लढवणार आहे.
लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष नसेल असे विजयने जाहीर केले आहे. तो लोकसभा प्रचारापासून लांब आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही संभ्रमात आहेत.

Web Title: Tamil Nadu Lok Sabha Election 2024: Actors step into the fray for leaders; Demand for campaigning increased, with all parties focusing on actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.