International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:24 IST2025-06-21T08:23:23+5:302025-06-21T08:24:42+5:30
International Yoga Day 2025: जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी देशभरात ११ लाखाहून अधिक ठिकाणी योग साधना होणार आहे.

International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
संजय पाठक
लोकमत न्यूज नेटवर्क
विशाखापट्टणम : जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी देशभरात ११ लाखाहून अधिक ठिकाणी योग साधना होणार आहे. त्यामुळे हा विक्रमाचा योग आहेच; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विशाखापट्टणम येथे सागर किनारी पाच लाख साधकांच्या उपस्थितीत योग साधना करणार आहेत. हा देखील एक विक्रम असणार आहे.
या कार्यक्रमासाठी शुक्रवारी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आर. के. बीच येथे तयारीची पाहणी केली. शनिवारी सकाळी साडेसहा ते पावणे आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूदेखील उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ११ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपकडून विविध कार्यक्रम साजरे होत असताना यंदाचा योग दिन अकरावा आहे. तो त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा अनोखा योग जुळून आला. योग दिनाच्या पूर्वसंध्येला आंध्रातील विद्यापीठात २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी एकाच वेळी १०८ मिनिटांत १०८ सूर्यनमस्कार घालत इतिहास रचला. हा एक विश्वविक्रम नोंदविला गेला आहे.
‘योगसंगम’मध्ये अकरा लाखांहून अधिक कार्यक्रम
केंद्र सरकारने सुरू केलेल्या योग चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा आयुष मंत्रालयाने योग दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘योगसंगम’ या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. २१ जून रोजी किमान एक लाख ठिकाणी कार्यक्रम करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मात्र ११ लाखाहून अधिक संस्थांनी नोंदणी केली असल्याने हा विक्रम ठरला असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकमतला दिली.