one side politics of 'Votabhakti' and anther side patriotism says Prime Minister | एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 
एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 

पटणा - देशात एकीकडे व्होटभक्तीचं राजकारण होत आहे तर दुसरीकडे देशभक्ती सुरु आहे. 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण करा, त्यावेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काय केलं होतं? जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.  बिहारच्या अररियामध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी लोकांना संबोधित केले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 26 नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारतीय जवानांनी केंद्र सरकारकडे पाकिस्तानात घुसून बदला घेण्याची परवानगी मागितली. मात्र भारतीय जवानांना परवानगी नाकारण्यात आली. कारण काँग्रेसला मतांचे राजकारण करायचं होतं. सर्वांना माहित होतं की, ते दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. मात्र काँग्रेसने पाकिस्तानला शिक्षा देण्याऐवजी हिंदू लोकांना हिंदू दहशतवादी शब्द लावण्याचं षडयंत्र केलं असा आरोप पंतप्रधानांनी केला. 

आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं, दहशतवाद्यांना मारलं म्हणून काँग्रेस नेत्यांच्या पोटात दुखू लागलं. पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या सभेतही नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना सांगितले की जर तुम्हाला पुरावे हवे असतील तर पहिलं चीटफंड घोटाळा आणि घुसखोरी करणाऱ्यांचे पुरावे शोधा. सैनिकांच्या धाडसाचे पुरावे मागणं बंद करा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. 

एवढ्या उन्हातही इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित झालात. तुमची तपस्या मी वाया जावू देणार नाही. त्याचा परतावा मी व्याजासह तुम्हाला परत देणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच ज्यांना भारत मातेची अडचण होते असे लोक भारत तेरे तुकडे होंगे नारे लावणाऱ्यांच्या मागे जातात. असे लोक देशाच्या सेवेसाठी कशाला पुढे येणार? असा सवाल त्यांनी उपस्थित करत कन्हैयाकुमारवर टीका केली. 

देशभक्तीचं राजकारण काय असतं हे तुम्ही उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर काय होतं हे बघितलं. भारताने दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं आणि पाकिस्तानचं तोंड बंद केलं. मात्र दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईवर आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेस नेते शोक व्यक्त करत आहेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला. 


Web Title: one side politics of 'Votabhakti' and anther side patriotism says Prime Minister
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.