‘लष्कराने संशयित दहशतवादी समजून गोळीबार केला’; नागालँड गोळीबार घटनेवर अमित शहांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 16:46 IST2021-12-06T16:29:20+5:302021-12-06T16:46:56+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर लोकसभेत महत्वाची माहिती दिली.

‘लष्कराने संशयित दहशतवादी समजून गोळीबार केला’; नागालँड गोळीबार घटनेवर अमित शहांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नागालँड गोळीबारावर लोकसभेत निवेदन दिले आहे. लष्कराने संशयित समजून गोळीबार केल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
अमित शहा काय म्हणाले ?
लोकसभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, 'बंदी घातलेल्या नॅशनल साेशलिस्ट काउंसिल ऑफ नागालॅंड-के( NSCN-K) या संघटनेच्या युंग ओंग गटाचे अतिरेकी या भागात लपल्याची माहिती लष्कराला मिळाली हाेती. त्यानंतर जवानांनी शाेध माेहीम सुरू केली हाेती. सुरक्षा दलांना एका बाेलेराे कारमधून अतिरेकी येत असल्याची माहिती मिळाली हाेती. मजूरही बाेलेराे पिकअप वाहनातून येत हाेते.'
'अंधारामध्ये गाडी ओळखण्यात चूक झाली. जवानांनी गाडी थांबविण्याचा इशारा दिला. मात्र, गाडी थांबली नाही. त्यामुळे जवानांनी गाेळीबार सुरू केला. जवानांना चूक लक्षात येईपर्यंत 6 जणांचा गाडीतच मृत्यू झाला हाेता. या घटनेतील दोन गंभीर व्यक्तींना उपचारासाठी आसामामध्ये पाठवण्यात आले आहे. तर काही जणांवर नागालँडमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी लष्कराची 2 वाहने जाळली आणि मोठा हिंसाचार उफळला. यात लष्कराचा एक जवान शहीद झाला आणि अनेकजण जखमी झाले. तसेच त्या घटनेत आणखी 7 लोक मरण पावले.'
विशेष तपास पथकाची स्थापना
या घटनेच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. एका महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश या पथकाला दिले आहेत. दरम्यान, रविवारी संध्याकाळी नागालँडच्या मौन शहरात आसाम रायफल्सवर हल्ला करण्यात आला. प्रत्युत्तराच्या कारवाईत एक नागरिक ठार आणि एक जखमी झाला. या घटनेवर लष्कराकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
NSCN(K) या बेकायदेशीर संघटनेच्या युंग आंग गटाचे दहशतवादी समजून लष्कराने काहीजणांवर गोळीबार केला. या घटनेत, 6 जणांचा मृत्यू झाला. पण, मृत्यू झालेल्यांमध्ये कोळसा खाणीतील कामगार होते. या घटनेनंतर संतत्प स्थानिकांनी लष्कराची वाहने जप्त केली. यावेळी झालेल्या हिंसाचारात एक जवान शहीद झाला, तर आणखी 7 स्थानिकांचा मृत्यू झाला.