मध्य प्रदेशातील काटकोन ओव्हरब्रिज; सोशल मीडियावर ट्रोल, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:09 IST2025-06-18T17:08:57+5:302025-06-18T17:09:30+5:30
MP News: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उभारण्यात आलेल्या या पुलाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मध्य प्रदेशातील काटकोन ओव्हरब्रिज; सोशल मीडियावर ट्रोल, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
MP News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील ऐशबाग स्टेडियमजवळ बांधलेला रेल्वे ओव्हरब्रिज (आरओबी) गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेत आलाय. याचे कारण म्हणजे, या पुलाला चक्क ९० अंशांचे विचित्र वळण देण्यात आले आहे. अशाप्रकारच्या काटकोन पुलामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. या पुलाच्या आकारामुळे सोशल मीडियावर याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.
दरम्यान, स्थानिकांनी अपघाताबाबत चिंता व्यक्त केली, मात्र या बांधकामाशी संबंधित अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की, पुरेशी जमीन उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परंतु आता रेल्वे विभागाने या पुलाचा आकार बदलण्यासाठी अतिरिक्त जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) सूत्रांनी सांगितले की, रेल्वेने जमीन दिल्यास पुलाची रेलिंग तोडून, त्याचा आकार बदलला जाईल. यामुळे वाहनांना वळण्यासाठी अतिरिक्त जागाही उपलब्ध होईल.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला
१८ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा रेल्वे ओव्हरब्रिज ६४८ मीटर लांब आणि ८.५ मीटर रुंद आहे. याचे फोटो सोशल मीडियावरील प्रचंड व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी याच्या डिझाइनवर प्रश्न उपस्थित केला, तसेच हे वळण अपघातप्रवण क्षेत्र बनू शकते, अशी भीतीही व्यक्त केली. आता मात्र याचा आकार बदलला जाणार आहे.
काम कधी सुरू झाले?
ऐशबाग रेल्वे क्रॉसिंग बंद झाल्यानंतर या भागात रेल्वे ओव्हरब्रिजची मागणी करण्यात आली होती. सरकारी निवेदनानुसार, या ओव्हरब्रिजचे बांधकाम २१ मार्च २०२३ रोजी सुरू झाले. भोपाळमधील ऐशबाग स्टेडियमसमोर असलेला हा रेल्वे ओव्हरब्रिज महामाई बाग आणि पुष्पा नगरसह स्टेशन परिसरातील लोकांसाठी उभारण्यात आला आहे. या ओव्हरब्रिजचे बांधकाम सुरू करताना सरकारने असे म्हटले होते की, यामुळे ऐशबाग परिसरातील लोकांना गेटवर थांबावे लागणार नाही, किंवा त्यांना लांब वळसा घ्यावा लागणार नाही.