हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:27 IST2025-05-18T12:06:58+5:302025-05-18T13:27:42+5:30
गुलजार हाऊसजवळील एका रहिवासी इमारतीत ही आग लागून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून, डझनभर लोक जखमी झाल्याचे म्हटले जात आहे.

हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील चारमिनार परिसरात रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. गुलजार हाऊसजवळील एका रहिवासी इमारतीत ही आग लागून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून, डझनभर लोक जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या आगीत एकूण किती जणांनी आपला जीव गमावला याचे अधिकृत आकडे समोर आले नसले तर, आतापर्यंत १७ लोक मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे.
आगीची ही घटना रविवारी पहाटे ५ ते ६ वाजेदरम्यान घडली. घटनास्थळी तात्काळ पोहोचलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या ११ गाड्या आग विझवण्याच्या कामात गुंतल्या असून, १० रुग्णवाहिका जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी, इमारतीत अडकलेल्या अनेकांना वाचवता आले नाही.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
आग लागण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक तपासात एसीमधील शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घरात लावलेला एसी सतत चालू असल्यामुळे वायरिंग तापली आणि अचानक आग लागल्याची शक्यता आहे. या आगीमध्ये अभिषेक मोदी (३०), आरुषी जैन (१७), हर्षाली गुप्ता (७), शीतल जैन (३७), राजेंद्र कुमार (६७), सुमित्रा (६५), मुन्नीबाई (७२), इराज (२) यांचा मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत १४ जणांना या आगीतून बाहेर काढण्यात यश आले असून, त्यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे. मात्र, हे सर्वजण गंभीररित्या भाजले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सदर इमारतीत ३० हून अधिक लोक राहत होते.
A devastating fire broke out in Gulzar House, under the jurisdiction of Mir Chowk Police Station in Hyderabad. The flames quickly engulfed the area, prompting a swift response from fire and rescue teams, who managed to save several people trapped inside.
— Vishnu Vardhan Reddy (@SVishnuReddy) May 18, 2025
Sadly, three individuals… pic.twitter.com/pi6POh8vNA
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी आणि राज्याचे मंत्री पन्नम प्रभाकर यांनी घटनास्थळी भेट दिली. एआयएमआयएमचे नेते आणि माजी आमदार मुमताज अहमद खान हे देखील घटनास्थळी उपस्थित होते आणि मदतकार्याची माहिती घेतली. सध्या पोलीस तपास सुरू असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी सतत कार्यरत आहेत.