दोन दिवसांपासून बेपत्ता होती तरुणी; अखेर विवाहित सहकाऱ्यासोबत रेल्वे रुळावर आढळले मृतदेह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:25 IST2026-01-11T16:23:45+5:302026-01-11T16:25:09+5:30
Lucknow Office Colleagues Suicide News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका विवाहित पुरुष आणि अविवाहित तरुणीने रेल्वेसमोर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपासून बेपत्ता होती तरुणी; अखेर विवाहित सहकाऱ्यासोबत रेल्वे रुळावर आढळले मृतदेह!
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. शनिवारी आलमनगर स्टेशनजवळील जलालपूर रेल्वे क्रॉसिंगवर एका पुरुष आणि एका महिलेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. दोघांचीही ओळख पटवण्यात आली असून, ते लखनौ येथील रहिवासी होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये अंदाजे २५ वर्षीय दीपाली (रा. अर्जुनगंज, लखनऊ) आणि ४० वर्षीय सूर्यकांत (रा. निशातगंज, लखनऊ) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात सूर्यकांत विवाहित असल्याचे, तर दीपाली अविवाहित असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, हे दोघेही कॅन्टोन्मेंट परिसरातील एकाच खासगी कार्यालयात एकत्र काम करत होते. दीपाली बेपत्ता असल्याची तक्रार सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वीच दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, १० जानेवारी रोजी तालकटोरा पोलीस स्टेशन परिसरातून आत्महत्येची ही तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फील्ड युनिटनेही घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या आधार कार्डवरून मृतांची ओळख पटवली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण आणि दोघांमधील संबंधांबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.