"आता लवकरच लग्न करावं लागेल"; रायबरेलीतील सभेदरम्यान राहुल गांधींनी थेट सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:42 IST2024-05-13T17:33:54+5:302024-05-13T17:42:01+5:30
Rahul Gandhi And Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी ते कधी लग्न करणार आहेत हे सांगितलं.

"आता लवकरच लग्न करावं लागेल"; रायबरेलीतील सभेदरम्यान राहुल गांधींनी थेट सांगितलं
रायबरेली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी रायबरेलीमध्ये पोहोचल्या आहेत. याच दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीत सभा घेतली. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी उपस्थित होत्या. यावेळी सभेत राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी ते कधीपर्यंत लग्न करणार आहेत हे सांगितलं आहे.
एका मुलाने राहुल गांधींना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "आता असं वाटतं की लवकरच लग्न करावं लागेल." प्रियंका गांधी यांनी आज रायबरेलीमध्ये घरोघरी जाऊन निवडणूक प्रचार केला. त्या घरोघरी जाऊन लोकांना भेटत आहेत.
काँग्रेस नेते आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित केले आणि आपण रायबरेलीमधून निवडणूक का लढण्यासाठी आलो आहोत हे सांगितलं.
"काही दिवसांपूर्वी मी आई (सोनिया गांधी) यांच्यासोबत बसलो होतो, एक-दोन वर्षांपूर्वी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की, माझ्या दोन माता आहेत, एक सोनिया गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी. माझ्या दोन्ही मातांची ही कर्मभूमी आहे, म्हणूनच मी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यावेळी अमेठीतून नाही तर रायबरेलीमधून निवडणूक लढवत आहेत. जिथे त्यांचा सामना हा भाजपाचे दिनेश प्रताप सिंह यांच्याशी आहे. सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार होत्या.