"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 19:37 IST2024-05-30T19:37:01+5:302024-05-30T19:37:32+5:30
Lok Sabha Elections 2024: "2024 च्या लोकसभा निवडणुकीत 2004 सारखी परिस्थिती पाहायला मिळेल. इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार."

"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 2004 सारखी परिस्थिती पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, काँग्रेस आणि I.N.D.I.A आघाडी देशातील अनेक राज्यांमध्ये चमकदार कामगिरी करेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश म्हणाले, "I.N.D.I.A आघाडी यावेळी देशातील अनेक राज्यांमध्ये चांगली कामगिरी करेल. काँग्रेस पक्ष 20 वर्षांपूर्वीस म्हणजेच 2004 सारख्या स्थितीकडे वाटचाल करत आहे. पक्ष राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस मोठी मुसंडी मारेल. याशिवाय छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आसाममध्येही पक्षाची स्थिती सुधारेल. पहिल्या दोन टप्प्यांनंतर दक्षिणेत भाजपचा सफाया झाला आहे आणि उत्तरेत निम्म्यापेक्षा कमी जागा मिळणार आहेत," असे ते म्हणाले.
2004 च्या निकालावर जयराम रमेश काय म्हणाले?
यावेळी रजराम रमेश यांनी एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केले. "2004 मध्ये एक्झिट पोलने NDA ला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली होती, पण प्रत्यक्षात निकाल उलटच झाला. 2019 मध्ये काँग्रेसला राजस्थानमध्ये 0, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 1 जागा मिळाली. पण, आता भाजपला उत्तर प्रदेशात 62, बिहारमध्ये 39 आणि पश्चिम बंगालमध्ये 18 जागा जिंकणेही अशक्य आहे. यावेळी I.N.D.I.A आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार आहे," असा दावाही त्यांनी यावेळी केला.