नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन, मित्रपक्षांचे पाठिंब्याचे पत्र; जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 06:31 IST2024-06-06T06:11:25+5:302024-06-06T06:31:29+5:30
Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती.

नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन, मित्रपक्षांचे पाठिंब्याचे पत्र; जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम
- संजय शर्मा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. दिल्लीत बुधवारी झालेल्या या बैठकीत तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू व संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्यासह सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी एनडीएला समर्थन देत असल्याचे पत्र सादर केले. त्यामुळे निकालानंतर चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत या प्रस्तावावर सर्व पक्षांनी आपली सहमती नोंदविली.
नितीश कुमार यांनी एनडीएने सरकार स्थापनेचा तातडीने दावा करण्याची मागणी केली, तर चंद्राबाबू नायडू यांनीही त्यास उशीर करू नये, असेही मत व्यक्त केले. दरम्यान, या बैठकीनंतर चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत नायडू यांनी लोकसभाध्यक्षपदासह तीन महत्त्वाच्या खात्यांची मागणी केल्याचे समजते.
शुक्रवारी राष्ट्रपतींकडे दावा; शनिवारी शपथविधी?
एनडीएच्या सर्व खासदारांची शुक्रवार, ७ जून रोजी दुपारी २ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात येईल. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीनंतर एनडीएचे सर्व प्रमुख नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर शनिवारी, ८ जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे.
राष्ट्रपतींकडून लोकसभा विसर्जित, मोदींचा राजीनामा
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना १७ वी लोकसभा तातडीने विसर्जित केली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत केंद्रीय मंत्रिमंडळासह पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
राष्ट्रपतींनी पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला, तरी नव्या सरकारने कार्यभार स्वीकारेपर्यंत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळांने आपली सेवा बजावावी अशी सूचना केली आहे.