खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 20:10 IST2024-04-24T20:10:40+5:302024-04-24T20:10:58+5:30
पंजाबमधील अजनाला घटनेनंतर अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप अमृतपाल सिंगवर आहेत.

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा
खलिस्तानी समर्थक 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग हा लोकसभा लढविणार आहे. दिब्रुगढ तुरुंगात बंद असलेल्या अमृतपाल सिंग याच्या वकिलाने ही माहिती दिली आहे.
पंजाबमधील अजनाला घटनेनंतर अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप अमृतपाल सिंगवर आहेत. एनएसएच्या आरोपांखाली अमृतपाल तुरुंगात आहे. तो खडूर साहिब येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्याचे वकील माजी खासदार राजदेव सिंग खालसा यांनी दिली आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये अमृतपालने त्याच्या साथीदारांसह पंजाबच्या अजनाला पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला केला होता. अपहरण आणि दंगलीतील आरोपींपैकी एकाच्या सुटकेसाठी हा प्रकार केला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. अमृतपालविरोधात त्याच्याच एका माजी साथीदाराने तक्रार दाखल केली होती.
पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धू यांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी वारिस पंजाब दे या संस्थेची स्थापना केली होती. तरुणांना शीख धर्माच्या मार्गावर आणणे आणि पंजाबला जागृत करणे हा त्याचा उद्देश असल्याचे दीप सिद्धू म्हणाला होता. दीप सिद्धूचे नाव शेतकऱ्यांच्या आंदोलनात आणि त्यानंतर 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात पुढे आले. 15 फेब्रुवारी 2022 रोजी दिल्लीहून पंजाबला परतत असताना दीप सिद्धूचा सोनीपतजवळ रस्ता अपघातात मृत्यू झाला. यानंतर अमृतपाल आता वारिस पंजाब दे संघटनेचा नवा नेता असल्याचा दावा मार्चमध्ये करण्यात आला होता.