ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:02 IST2025-11-17T14:01:49+5:302025-11-17T14:02:53+5:30
Jubilee Hills Byelection : कोण आहेत नवीन यादव? जाणून घ्या...

ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
Jubilee Hills Byelection : नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीसोबतच अनेक राज्यात पोटनिवडुकाही झाल्या. तेलंगणातील जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीत AIMIM च्या पाठिंब्याने काँग्रेसच्या नवीन यादव यांनी दणदणीत विजय मिळवला. 2014 पासून या जागेवर बीआरएस पक्षाची एकहाती वर्चस्व होते. मात्र, या पोटनिवडणुकीत काँग्रेसने हे वर्चस्व संपुष्टात आणले.
तेलंगणातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने दीर्घ प्रतीक्षेनंतर विजय मिळवत BRS च्या सलग तीन कार्यकाळांच्या वर्चस्वाला पूर्णविराम दिला. ही तीच जागा आहे, जिथून अझरुद्दीन यांनी गेल्या वेळी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. आता या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांनी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या पाठिंब्याच्या जोरावर 24,729 मतांनी विजय मिळवला.
असा खेचून आणला विजय...
पूर्वीच्या अनुभवांतून धडा घेत राज्यातील काँग्रेस आणि नवीन यादव यांनी महत्वाची चाल खेळली. AIMIM ने या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार न देण्याची विनंती काँग्रेसने केली होती. ओवेसी यांनी ही मागणी मान्य केली आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही नवीन यादव यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस व BRS यांच्यात थेट लढत तयार झाली. भाजपनेही आपला उमेदवार दिला होता, मात्र त्याने फारसा फरक पडला नाही.
ओवेसींचे पाया पडून आभार मानले
या विजयानंतर नवीन यादव यांनी ओवेसींची भेट घेऊन त्यांच्या पायांना स्पर्श करत आभार मानले. दरम्यान, जुबली हिल्समधील विजय हा काँग्रेससाठी केवळ एका जागेचा विजय नाही, तर भारत राष्ट्र समिती (BRS) विरुद्ध तेलंगणातील राजकीय समीकरणांना नवीन दिशा देणारा परिणाम आहे. याशिवाय, AIMIM आणि काँग्रेस यांच्यातील बदलते संबंध भविष्यातील राजकारणातही मोठी भूमिका बजावू शकतात.
जुबली हिल्स जागेचा इतिहास
जुबली हिल्स मतदारसंघात 2014 पासून BRS (पूर्वी TRS) चे वर्चस्व होते. 2014, 2018 आणि 2023 अशा सलग तीन वेळा मंगंती गोपीनाथ यांनी विजय मिळवला होता. 2023 मध्ये काँग्रेसने माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांना उमेदवारी दिली होती, पण ते पराभूत झाले. AIMIM ने तेव्हा स्वतःचा उमेदवार दिल्याने मुस्लिम मते विभागली होती.
काँग्रेसच्या विजयाची कारणे
मंगंती गोपीनाथ यांच्या अकाली निधनाने ही जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत BRS ने त्यांच्या पत्नी मंगंती सुनीता यांना उमेदवारी दिली. मुख्य लढत काँग्रेस विरुद्ध BRS अशी होती. काँग्रेसने या निवडणुकीत दोन महत्त्वाचे पावले उचलली. पहिले म्हणजे, अजहरुद्दीन यांना विधन परिषदेवर घेतले आणि मंत्रिपद देऊन मुस्लिमांचा विश्वास परत मिळवला. आणि दुसरे म्हणजे, नवीन यादव यांना उमेदवारी देऊन ग्रेटर हैदराबादमधील यादव समुदायाची मते आपल्याकडे खेचली. अशा रितीने या समुदायातील पहिला आमदार बनण्याची संधी नवीन यादवांना मिळाली.
कोणाला किती मते मिळाली?
काँग्रेस- नवीन यादव : 98,988 मते
BRS - मंगंती सुनीता : 74,259 मते
BJP - दीपक रेड्डी : 17,061 मते