"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 15:09 IST2024-06-08T14:58:07+5:302024-06-08T15:09:02+5:30
Nitish Kumar And Lok Sabha Election Results 2024 : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. यात जेडीयूनेही पाठिंबा दिला आहे.

"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. यात जेडीयूनेही पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी शनिवारी एबीपी न्यूजशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला. "मुख्यमंत्री नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. नितीश कुमार यांनी भाजपा आणि एनडीएसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे" असं केसी त्यागी यांनी म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केसी त्यागी म्हणाले की, "पंतप्रधानांनी निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्वांना संदेश दिला आहे. जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी यांनी एनडीएच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आहे. पुढील 5 वर्षांसाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला आमचा पाठिंबा दिला आहे."
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार चर्चेत आले आहेत. त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चेला सुरुवात झाली होती. इंडिया आणि एनडीए आघाडीच्या नेत्यांना त्यांना आपल्या बाजुला ठेवायचं होतं, परंतु मुख्यमंत्री नितीश यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला आणि मोदी सरकार स्थापनेसाठी पाठिंब्याचे पत्रही सादर केले.
कोणत्याही एका पक्षाकडे सरकार स्थापनेचे आकडे नाहीत. याआधी फक्त भाजपाकडे पूर्ण बहुमत होतं. यावेळी युतीच्या मदतीने भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे घटक पक्षांचं महत्त्व वाढलं आहे. सर्वांच्या नजरा नितीश यांच्यावर खिळल्या आहेत. त्याचवेळी पाटण्याहून दिल्लीला जात असताना विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री नितीश यांच्यासोबत फ्लाइटमध्ये दिसले. या फोटोनंतर बिहारसह देशातील राजकारण तापलं होतं.