लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:54 IST2025-12-11T13:51:53+5:302025-12-11T13:54:12+5:30
Hyderabad Crime: प्रेमसंबंध आणि गर्भधारणेच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र वादानंतर हैदराबाद येथील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
प्रेमसंबंध आणि गर्भधारणेच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र वादानंतर हैदराबाद येथील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाचे त्याच्या लहापणीच्या मैत्रीणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून ती गर्भवती राहिली आणि याबाबत तिने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर आईने तिच्या प्रियकराला बोलावून घेतले आणि दोघांनाही झापले. लग्नाआधीच मुलगी गर्भवती राहिल्याने संतापलेल्या महिलेने जवळच पडलेल्या बॅटने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीला वाचवण्यासाठी तिचा प्रियकर मध्ये पडला. पण त्यावेळी त्याच्या डोक्याला बॅट लागली आणि तो गंभीर जखमी झाला. पहाटे त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अमीनपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. ज्योती श्रवण साई, असे मृत तरुणाचे नाव असून तो गांधीमैसम्मा येथील एका खाजगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. साईचे त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध होते. सोमवारी त्या मुलीला कळले की ती गर्भवती आहे. तिने मंगळवारी ही गोष्ट आपल्या आईला सांगितल्यावर त्यांच्यात मोठा वाद झाला. आईने अधिक चौकशी केल्यावर मुलीने कबूल केले की, ती साईसोबत प्रेमसंबंधात आहे. त्यानंतर मुलीच्या आईने साईला घरी बोलावण्यास सांगितले.
साई सकाळी ११ च्या सुमारास गांधीमैसम्मा येथील वसतिगृहातून मुलीच्या घरी आला. मुलीच्या आईने गर्भधारणेच्या मुद्द्यावरून त्याला जाब विचारला आणि दोघांनाही झापले. संतापलेल्या महिलेने मुलीला बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला वाचवण्यासाठी साई मध्ये पडला आणि बॅट त्याच्या डोक्याला लागली. आणि तो जखमी झाला. साई त्याच घरात थांबला आणि वेगळ्या खोलीत झोपला.
दरम्यान, सायंकाळी मुलीने मारहाणीमुळे वेदना होत असल्याची तक्रार केली, म्हणून तिला कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात नेले आणि मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी परतले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कुटुंबाच्या लक्षात आले की, साईला श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.