लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, आमदार केतन इनामदार यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 14:31 IST2024-03-19T14:30:29+5:302024-03-19T14:31:21+5:30
Gujarat BJP MLA Ketan Inamdar Resigns : काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांना मिळणाऱ्या जबाबदाऱ्या आणि पदांमुळे केतन इनामदार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, आमदार केतन इनामदार यांचा राजीनामा
Gujarat BJP MLA Ketan Inamdar Resigns : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. वडोदरा जिल्ह्यातील सावली मतदारसंघातील भाजपाचे आमदार केतन इनामदार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, केतन इनामदार हे भाजपावर नाराज आहेत. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांना मिळणाऱ्या जबाबदाऱ्या आणि पदांमुळे केतन इनामदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा सुद्धा समोर येत आहे.
केतन इनामदार यांनी रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांना ईमेल पाठवून राजीनामा दिला आहे. केतन इनामदार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्या अंतरात्म्याच्या आवाजाचा मान राखत मी आमदार पदाचा राजीनामा देत आहे. दरम्यान, 2012 मध्ये केतन इनामदार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2017 आणि 2022 मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले. वडोदरा जिल्हा पंचायत सदस्य म्हणून केतन इनामदार यांनी राजकारणाला सुरुवात केली. त्यांची सहकार क्षेत्रात पकड आहे. बडोदा डेअरीच्या प्रश्नावरही त्यांनी आवाज उठवला होता.
काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने केतन इनामदार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. सतीश पटेल यांना जिल्हाध्यक्ष केल्यामुळे केतन इनामदार नाराज असल्याचे म्हटले जाते. यापूर्वीही केतन इनामदार यांनी जानेवारी 2020 मध्ये आमदारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती, मात्र त्यावेळी विधानसभा अध्यक्ष्यांनी तो स्वीकारला नव्हता. तेव्हा केतन इनामदार यांनी असा दावा केला होता की, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मंत्री त्यांच्याकडे आणि त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत आहेत.