विधानसभेला तिकीट कापले, काँग्रेसकडून लढले; जगदीश शेट्टर भाजपमधून बेळगाव लोकसभा लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 13:33 IST2024-03-15T13:32:38+5:302024-03-15T13:33:17+5:30
शेट्टर यांचा विधानसभेचा हुबळी-धारवाड मध्य हा मतदारसंघ होता. परंतु, त्यांना आता १०० किमी दूरवर असलेला आणि मराठी बहुल असलेला बेळगाव मतदारसंघ देण्यात येत आहे.

विधानसभेला तिकीट कापले, काँग्रेसकडून लढले; जगदीश शेट्टर भाजपमधून बेळगाव लोकसभा लढणार
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पक्षाचा विश्वासघात करूनही लॉटरी लागली आहे. विधानसभेला तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या शेट्टर यांनी काँग्रेसची वाट धरली होती. काँग्रेसकडून निवडणूक लढविताना पराभव झाला. यानंतर काही दिवसांतच ते पुन्हा भाजपात आले होते. आता त्यांना खुद्द अमित शाह यांनीच लोकसभा लढण्याची ऑफर दिली आहे. ती शेट्टर यांनी आढेवेढे घेत स्वीकारही केली आहे.
जगदीश शेट्टर बेळगावमधून लोकसभा लढविणार आहेत. भाजपात घरवापसी केल्यानंतर शेट्टर यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात आले होते. शेट्टर यांचा विधानसभेचा हुबळी-धारवाड मध्य हा मतदारसंघ होता. परंतु, त्यांना आता १०० किमी दूरवर असलेला आणि मराठी बहुल असलेला बेळगाव मतदारसंघ देण्यात येत आहे. शेट्टर यांचे आधी धारवाड आणि हावेरी मतदारसंघात लढण्याची बोलणी झाली होती. परंतु, ऐनवेळी त्यांना बेळगावची ऑफर देण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेट्टर यांना फोन करून बेळगाव लोकसभा मतदारसंघातून लढणार का अशी विचारणा केली होती. यावर शेट्टर यांनी विचार करून कळवितो असे सांगितले होते. शाह यांनी शेट्टर यांना बेळगावात जिंकण्याची हमी दिली होती. आज शेट्टर यांनी लढण्यास तयार असल्याचे शाह यांना कळविले आहे.
२०१९ मध्ये बेळगावमध्ये भाजपाचे दिवंगत खासतदार सुरेश अंगडी निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर अंगडी यांची पत्नी मंगला अंगडी यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. त्या २०२१ मध्ये लोकसभेवर गेल्या होत्या. आता भाजपाने २००४ पासून ताब्यात असलेल्या बेळगाव मतदारसंघामध्ये शेट्टर यांना उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.