CoronaVirus Live Updates : ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल 102 जण पॉझिटिव्ह, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 08:34 AM2021-04-13T08:34:14+5:302021-04-13T08:44:35+5:30

CoronaVirus Live Updates And Kumbh Mela 2021 : प्रशासनाला गर्दी नियंत्रित करण्यात अपयश येत असून कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्यात पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली.

CoronaVirus Live Updates kumbh mela 2021 no thermal screening no mask 102 people test positive for covid19 | CoronaVirus Live Updates : ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल 102 जण पॉझिटिव्ह, परिस्थिती गंभीर

CoronaVirus Live Updates : ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल 102 जण पॉझिटिव्ह, परिस्थिती गंभीर

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. सोमवती अमावास्येच्या पर्वावर होणाऱ्या महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. शाहीस्नानासाठी आलेल्या अनेक आखाड्यांतील साधू-संत आणि महंतांना कोरोना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे. कुंभमेळ्यात तब्बल 102 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

प्रशासनाला गर्दी नियंत्रित करण्यात अपयश येत असून कोरोना नियमांचे सक्तीने पालन करण्यात पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली. ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे. याच दरम्यान महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर 102 साधू व भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती मिळत आहे. हरिद्वारमध्ये लाखो साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30  ते सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 18,169 भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल 102 साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

संतांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह 

शाहीस्नानापूर्वी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यासह अनेक संतांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी महाराज यांचीही प्रकृती खालावली आहे. रविवारपासून 10  हून अधिक संत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व संतांना शाहीस्नान करता आले नाही. हरिद्वारला येण्यापूर्वी भाविकांनी कोरोना नसल्याचा रिपोर्ट सोबत आणणे बंधनकारक केले होते. हरिद्वारमध्येही दररोज 50 हजार जणांची चाचणी करण्यात येत आहे.  

महाकुंभावर 350 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर 

महाकुंभावर 350 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यापैकी 100 कॅमेरे सेन्सरने सज्ज असून मास्क न घालणाऱ्या व्यक्तींचा त्यातून तत्काळ अलर्ट मिळणार आहे. सुभाष घाट, ब्रह्मकुंड इत्यादी ठिकाणी अशा कॅमेऱ्यांची संख्या जास्त आहे. कोरोना नियमांसोबतच सुरक्षेच्या दृष्टीनेही परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे. स्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. अनेक भाविक विनामास्क स्नान करताना दिसून आले. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना आढळून आले. सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, सक्ती केल्यास घाटांवर चेंगराचेगरी होण्याची भीती पोलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates kumbh mela 2021 no thermal screening no mask 102 people test positive for covid19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.