देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर, काँग्रेसची टीका, रोजगाराबाबत पक्षाकडे ठोस योजना असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 09:16 AM2024-03-28T09:16:45+5:302024-03-28T09:16:58+5:30

प्रियांका गांधी यांनी म्हटले की, भारतातील कामगारांपैकी ८३% बेरोजगार तरुण आहेत.

Congress criticizes the 'time bomb' of unemployment in the country, claims that the party has a concrete plan for employment | देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर, काँग्रेसची टीका, रोजगाराबाबत पक्षाकडे ठोस योजना असल्याचा दावा

देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर, काँग्रेसची टीका, रोजगाराबाबत पक्षाकडे ठोस योजना असल्याचा दावा

नवी दिल्ली : भारतातील रोजगार परिस्थितीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) आणि मानव विकास संस्थेच्या (आयएचडी) अहवालावरून काँग्रेसने देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर बसला आहे, अशी टीका केंद्र सरकारवर केली. 
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, जयराम रमेश आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी या अहवालाचा उल्लेख करताना काँग्रेसकडे रोजगाराबाबत ठोस योजना असल्याचेही सांगितले.

“आमच्या तरुणांना केंद्र सरकारच्या दयनीय उदासीनतेचा फटका सहन करावा लागत आहे, कारण सतत वाढत्या बेरोजगारीने त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे,” असे खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केले. “आम्ही बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर बसलो आहोत. २०१२ च्या तुलनेत केंद्र सरकारच्या काळात तरुणांची बेरोजगारी तिपटीने वाढली असून, काँग्रेसने ‘युवा न्याय’ आणला आहे,” असे खरगे म्हणाले.

प्रियांका गांधी यांनी म्हटले की, भारतातील कामगारांपैकी ८३% बेरोजगार तरुण आहेत. २००० मध्ये एकूण बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा ३५.२ टक्के होता. २०२२ मध्ये तो ६५.७ टक्क्यांपर्यंत वाढला, म्हणजे दुप्पट झाला. दुसरीकडे पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार ‘सरकार बेरोजगारीची समस्या सोडवू शकत नाही’ असे म्हणत आहेत.

‘प्लॅन बी’अंतर्गत भाजपची जनार्दन रेड्डींसोबत भागीदारी 
कर्नाटकचे माजी मंत्री व खाण उद्योगपती जी. जनार्दन रेड्डींची भाजपमध्ये घरवापसी झाल्यानंतर काँग्रेसने बुधवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक रोखे सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केल्यांनतर भाजपने ‘प्लॅन बी’अंतर्गत खाण व्यावसायिकांशी थेट भागीदारी केल्याचा काँग्रेसने आरोप केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सीबीआय जनार्दन रेड्डी यांना अशी क्लीन चीट देईल की, त्यांच्यासमोर सर्व पांढरेपणा फिका पडेल, असे काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी भाजपला टोला लगावताना उपरोधिकपणे सांगितले.

Web Title: Congress criticizes the 'time bomb' of unemployment in the country, claims that the party has a concrete plan for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.