Congress candidate got angry on Shatrughan Sinha's presence for SP candidate nomination filing | शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त

शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त

लखनौ - काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेली पत्नी पूनम सिन्हा यांच्यासाठी प्रचार केल्याने काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे.  काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आज उत्तर प्रदेशमधून लखनौ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थित राहून पत्नीचा प्रचार केला. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या या कृतीमुळे लखनौमधील काँग्रेस उमेदवार संतप्त झाले असून, सिन्हा यांनी पक्षधर्म पाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांचा विरोध करत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाविरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणासाहिब येथून उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करत लखनौ येथून उमेदवारी मिळवली होती. आज पूनम सिन्हा यांनी लखनौ येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे पती शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते. तसेच पूनम सिन्हा यांच्या रोड शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीबाबत लखनौमधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षधर्म पाळावा असे आवाहनही त्यांनी केले. 

लखनौमध्ये भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसकडून आचार्य प्रमोद कृष्णम आणि सपाकडून पूनम सिन्हा यांच्या तिरंगी लढत होणार आहे. विशेष बाब म्हणजे लखनौमधून लढत असलेले तिन्ही उमेदवार बाहेरचे आहेत.  लखनौ लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा मजबूत किल्ला असून, 1991 पासून येथे सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय झाला आहे.    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress candidate got angry on Shatrughan Sinha's presence for SP candidate nomination filing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.