Cancel the applic Amit Shah's nomination from Gandhinagar ; Congress demand | अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव 

अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव 

अहमदाबाद - भाजपाध्यक्षअमित शहा यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. अमित शहा यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप करत  त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. अमित शहा हे गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून रिंगणात उतरले असून,  काँग्रेसने त्यांच्याविरोधात सी.जे. चावडा यांना उमेदवारी दिली आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करताना अमित शहा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप करत काँग्रेसने याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. अमित शहा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये दोन ठिकाणी चुकीची माहिती दिली, असा दावा काँग्रेसने केला आहे. अमित शहा यांनी गांधीनगरमध्ये असलेल्या एका प्लॉटबाबत आणि मुलाच्या कर्जाबाबत योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

अमित शहा यांनी आपल्या  मालमत्तेची किंमत कमी दाखवल्याचा आरोप काँग्रेसने प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचा हवाला देत केला आहे. शहांच्या मालमत्तेची किंमत सरकारी निकषांनुसार 66.5 लाख एवढी आहे. मात्र त्यांनी या मालमत्तेची किंमत केवळ 25 लाख रुपये दाखवली आहे.  तसेच अमित शहा यांनी मुलगा जय शहा यांच्या कंपनीसाठी आपली संपत्ती गहाण ठेवून 25 कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचाही उल्लेख या शपथपत्रात नसल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार सी. जे. चावडा यांनी केला. 

मात्र भाजपा प्रवक्ते भरत पांड्या यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी पक्ष आणि त्यांचे उमेदवार अमित शहा यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत.  शहा यांनी कर्ज चुकते केले असून, गहाण ठेवलेली संपत्ती परत मिळवली आहे. काँग्रेस कुठलीही पडताळणी केल्याशिवाय आरोप करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.   

Web Title: Cancel the applic Amit Shah's nomination from Gandhinagar ; Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.