‘400 पार’साठी भाजपचे मिशन ‘कोंगू प्रांत’, कोईम्बतूर, सेलममध्ये मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 13:17 IST2024-03-21T11:46:07+5:302024-03-21T13:17:20+5:30
तामिळनाडूच्या वायव्येला व कर्नाटकलगत असलेल्या कोंगू प्रांतात हिंदुत्ववादी राजकारणाला पूर्वीपासूनच समर्थन मिळत आले आहे.

‘400 पार’साठी भाजपचे मिशन ‘कोंगू प्रांत’, कोईम्बतूर, सेलममध्ये मोदींनी फोडला प्रचाराचा नारळ
- असिफ कुरणे
चेन्नई : लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ चा नारा दिलेल्या भाजपने दक्षिणेतही लक्ष घातले आहे. तामिळनाडूमध्ये यंदा किमान पाच जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प आहे. त्यासाठी पक्षाने कोंगू मंडलम प्रांतात जोर लावला आहे. अण्णा द्रमुकचा हा बालेकिल्ला आहे. २०२१ च्या विधानसभेला भाजपने येथूनच दोन जागा जिंकल्या. पीएमकेचा एनडीएत समावेश झाल्याने येथे भाजपला लाभ होण्याची आशा आहे.
तामिळनाडूच्या वायव्येला व कर्नाटकलगत असलेल्या कोंगू प्रांतात हिंदुत्ववादी राजकारणाला पूर्वीपासूनच समर्थन मिळत आले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूर, सेलम येथून प्रचारास प्रारंभ केला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात द्रमुकची लाट असतानादेखील कोंगू प्रांताने अण्णा द्रमुकला साथ दिली होती. त्यावेळी ३० पेक्षा अधिक जागा अण्णा द्रमुकने जिंकल्या होत्या.
२०१९ मध्ये कोणाला किती मते?
एकूण जागा ३८
द्रमुक २३
काँग्रेस ८
सीपीआय २
सीपीआय (एम) २
आयएमएल १
अन्य २
तिरंगी लढतीत लॉटरीची संधी
सत्ताधारी द्रमुक, विरोधी अण्णा द्रमुक आणि एनडीए अशा तिरंगी लढतीत कोंगू प्रांतातील काही जागांवर भाजपला विजय मिळू शकतो, असा अंदाज सर्वेक्षणांमध्ये व्यक्त करण्यात आला.
पीएमके दहा जागा लढविणार असून त्यातील काही जागा या कोंगू प्रांतातील असतील. पीएमके व भाजप हे आपली ताकद कोंगू प्रांतात लावत असल्याचे सध्याचे चित्र आहे.