भाजप ४५० जागांवर गुढीपाडव्यापासून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 06:56 IST2024-03-30T05:44:43+5:302024-03-30T06:56:18+5:30
निवडणुकीचा शंखनाद; पंतप्रधान मोदींसह ५० स्टार प्रचारक

भाजप ४५० जागांवर गुढीपाडव्यापासून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार
- संजय शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाचे ५०हून अधिक स्टार प्रचारक देशातील ४५०हून अधिक मतदारसंघात प्रचार करणार आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी प्रचार सुरू होणार आहे.
लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्यासाठी भाजप देशातील ४५० लोकसभा मतदारसंघात आपले ५० स्टार प्रचारक उतरविणार आहे. भाजपचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदी यांची मागणी सर्वात जास्त आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना ‘अ’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
मतदान होणार असलेल्या जवळपास प्रत्येक जागेवर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यापैकी कोणत्याही एका नेत्याची निवडणूक सभा होईलच. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी यांना ‘बी’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निवडणूक सभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात होणार आहेत.
भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, मनोज तिवारी, रविकिशन, कंगना रनौत, अरुण गोविल, हेमा मालिनी, निरहुआ यांच्यासह दोन डझनहून अधिक नेत्यांना ‘सी’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
५० हून अधिक हेलिकॉप्टर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने संपूर्ण लोकसभा निवडणुकीसाठी ५० हून अधिक हेलिकॉप्टर बुक केले आहेत आणि सुमारे २० हेलिकॉप्टर ऐनवेळीसाठी राखीव ठेवले आहेत.