दारुला आधार कार्डशी लिंक करा, विधानसभेत भाजपा आमदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 20:10 IST2020-02-10T20:09:19+5:302020-02-10T20:10:03+5:30
दारुवर जास्तीचा खर्च करणाऱ्या व्यक्तींच्या सरकारी सवलती आणि फायदे रोखण्यात यावे

दारुला आधार कार्डशी लिंक करा, विधानसभेत भाजपा आमदाराची मागणी
जयपूर - राजस्थानमध्ये नवीन अबकारी करप्रणाली जाहीर करण्यात आल्यानंतर विधानसभेची पहिली बैठक झाली. या बैठकीत दारूचा मुद्दा उचलण्यात आला होता. राज्यपालाच्या अभिभाषण भाषणावर वाद-विवाद कार्यक्रमात बोलताना भाजपा आमदार मदन दिलावर यांनी दारूवर नियंत्रण ठेवण्याचा मुद्दा लावून धरला. विशेष म्हणजे दारूविक्री ही आधार कार्डशी संलग्नित करण्यात यावी, अशी मागणीही दिलावर यांनी केली.
दारुवर जास्तीचा खर्च करणाऱ्या व्यक्तींच्या सरकारी सवलती आणि फायदे रोखण्यात यावे. जर एखादी व्यक्ती दारुवर जास्तीचा खर्च करत असेल, तर इतरही बाबींवर तो खर्च करू शकतो, असा तर्कही दिलावर यांनी सांगितला. दारुची विक्री आधार कार्डच्या आधारावर करण्यात यावी, त्यामुळे दारुविक्रीवर नियंत्रण येईल, असे दिलावर यांनी म्हटले. विधानसभा सभागृहात होत असलेल्या दारुबंदीच्या चर्चेदरम्यान मदन दिलावर यांनी आपल मत मांडलं. तसेच, सरकारकडून दारुवर बंदी आणण्याची चर्चा केली जाते, पण प्रत्यक्षात कृती काहीच नाही, असेही ते म्हणाले.
या चर्चेवेळी रामगंजमंडी मतदारसंघाच्या आमदारांनी दिलावर यांची री ओढत दारुवर नियंत्रण आणण्यासाठी आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले. दारू विकत घेताना, ग्राहकांचे आधार कार्डही नोंदणी करण्यात यावे. तसेच, दारिद्र रेषेखालील नागरिकही किती दारू खरेदी करतात, याचीही माहिती घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.