स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, दोन फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 11:43 IST2019-05-27T11:42:05+5:302019-05-27T11:43:24+5:30
स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, दोन फरार
अमेठी - भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर सनसनाटी विजय मिळवला. दरम्यान, या विजयाला काही तास उलटत नाहीत तोच स्मृती इराणींचे निकटवर्तीय आणि बरौलिया गावचे माजी सरपंच असलेल्या सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत तीन आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
निवडणुकीतील वादामधून सुरेंद्र सिंह यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र सिंह यांची हत्या झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी तातडीने अमेठीकडे धाव घेतली होती. तसेच त्यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता. सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला खांदा देतानाच स्मृती इराणी यांनी आरोपींना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढू, असे सांगितले होते.
दरम्यान, सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नसीम, धर्मनाथ गुप्ता आणि बी.डी.सी रामचंद्र यांना अटक केली आहे. तसेच या तिघांचीही कसून चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणातील दोन आरोपी वसीम आणि गोलू हे फरार आहेत.
शनिवारी रात्री रात्री सुरेंद्र सिंह हे घराबाहेर झोपले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींच्या प्रचारामध्ये सुरेंद्र सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना लाभ मिळाला होता.