नाराज छगन भुजबळांना अजित पवार देणार वेगळी संधी?; ३ पदांबाबत सुरू आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:41 IST2024-12-16T13:40:26+5:302024-12-16T13:41:33+5:30

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून का डावलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहे.

Will ncp Ajit Pawar give a different opportunity to the party leader Chhagan Bhujbal | नाराज छगन भुजबळांना अजित पवार देणार वेगळी संधी?; ३ पदांबाबत सुरू आहे चर्चा

नाराज छगन भुजबळांना अजित पवार देणार वेगळी संधी?; ३ पदांबाबत सुरू आहे चर्चा

NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे राज्याचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नसल्याने भुजबळ समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. भुजबळ यांना डावलण्याबाबत कोणतेही कारण देण्यात आले नसल्याने याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. येवला मतदारसंघातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज त्यांच्या समर्थकांनी मेळावा आयोजित केला आहे.

छगन भुजबळ हे अत्यंत आक्रमक शैलीचे नेते म्हणून परिचित असून, मंडल आयोगाच्या मुद्यावरून त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ओबीसी समाजासाठी त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून देशपातळीवर लढा उभारला. अलीकडेच राज्यात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय करू नये ही त्यांची भूमिका राज्यकर्त्यांनाही बऱ्यापैकी उपयुक्त ठरली. राज्य सरकारात राहून त्यांनी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना थेट आव्हान देऊन अंगावरही घेतले होते.

तब्बल सात वेळा निवडून येणाऱ्या भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक पदे भूषविल्याने त्यांचे कॅबिनेटमंत्रिपद नक्कीच मानले जात होते. किंबहुना नाशिकमधून छगन भुजबळ आणि दादा भुसे ही दोन मंत्रिपदे महत्त्वाची मानली जात होती. परंतु नाशिकमधून नरहरी झिरवाळ आणि अॅड. माणिकराव कोकाटे यांना संधी मिळाल्यानंतर भुजबळ यांच्या मंत्रिपदाविषयी शंका घेतली जाऊ लागली. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असल्याने नाशिकमधून राष्ट्रवादीच्या तीन-तीन आमदारांना संधी मिळेल काय याविषयी शंका होती. त्यानंतर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याचे स्पष्ट झाले. 

कुठे संधी दिली जाणार?

छगन भुजबळ यांनी मध्यंतरी राज्यसभेवर संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून पाठविले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद, विधानसभा उपाध्यक्षपद किंवा तत्सम महत्त्वाचे संविधानिक पद दिले जाण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भुजबळ यांना मंत्रिमंडळातून का डावलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहे. मराठा समाजाचे आंदोलनाची धग कमी करण्यासाठी त्यांना डावलले असावे, असे एक सांगितले जाते किंवा नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांना नियुक्त करण्यावरूनही पेच निर्माण होऊ शकतो, हा संभाव्य पेच टाळण्यासाठी असे केले जाऊ शकते, असे काहींचे म्हणणे आहे.
 

Web Title: Will ncp Ajit Pawar give a different opportunity to the party leader Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.