ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:04 IST2025-12-25T14:03:11+5:302025-12-25T14:04:00+5:30
दिनकर पाटील यांच्यावर मनसे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक मनसेत ते सक्रीय सहभागी होते

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपाने उद्धवसेना, मनसे आणि काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. २ माजी महापौरांसह विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना गळाला लावण्याचं काम भाजपाने केले आहे. विनायक पांडे, यतीन वाघ या उद्धवसेनेच्या नेत्यांसोबतच मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. दिनकर पाटील यांच्या अचानक राजीनाम्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
दिनकर पाटील यांच्यावर मनसे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक मनसेत ते सक्रीय सहभागी होते. बुधवारी ठाकरे बंधू यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर नाशिकमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, फटाके फोडले. या जल्लोषात दिनकर पाटील हेदेखील आघाडीवर होते. मात्र युतीच्या घोषणेला २४ तास उलटत नाहीत तोवर दिनकर पाटील यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. दिनकर पाटील यांनी मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
नाशिकमध्ये भाजपात इतर पक्षातील दिग्गज नेते पक्षप्रवेश करत असताना दुसरीकडे भाजपातील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. आमदार देवयानी फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला जाहीर विरोध केला. नाशिकमध्ये भाजपा कार्यालयाबाहेर नाराज कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. पक्षातील संतप्त कार्यकर्त्यांनी वसंत स्मृती पक्ष कार्यालयासमोर गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फरांदे यांची नाराजी असताना गिरीश महाजन यांनी त्यांना चर्चेला बोलावले परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र तरीही देवयानी फरांदे नाराज असतानाही पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आला.
कोणते नेते भाजपात?
नाशिकमध्ये उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे पहिले महापौर आणि सध्या उद्धवसेनेत असलेले यतीन वाघ, मनसेचे माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले नितीन भोसले, उद्धवसेनेचे संजय चव्हाण, कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती शाहु खैरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला.