एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 10:53 AM2024-04-08T10:53:07+5:302024-04-08T10:55:24+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धवसेनेने शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देताना डावलल्याची भावना व्यक्त करीत माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी अखेरीस शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबात तीन पक्ष झाले आहेत.

Three parties in the same house! Babanrao Gholap in Shiv Sena, son Yogesh Gholap in Shiv Sena UBT, daughter tanuja Gholap in BJP | एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये

एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये

नाशिक -  उद्धवसेनेने शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देताना डावलल्याची भावना व्यक्त करीत माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी अखेरीस शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबात तीन पक्ष झाले आहेत. घोलप स्वतः शिंदेसेनेत असले तरी त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप हे उद्धवसेनेत आहेत आणि गेल्या वर्षीच त्यांची कन्या तनुजा घोलप यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे भिन्न पक्षांत कुटुंबीय विभागले आहे.

बबनराव घोलप हे पाच वेळा देवळाली मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांची एक कन्या नयना घोलप वालझाडे या नाशिकच्या महापौर म्हणून देखील राहिल्या आहेत. त्यांची दुसरी कन्या तनुजा घोलप यांनी शिवसेनेकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. तर, शिवसेनेकडूनच बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे देवळाली मतदारसंघातूनच आमदार म्हणून निवडले गेले होते. गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांनी त्यांचा पराभव केला होता.

दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यानंतर बबनराव घोलप आणि योगेश घोलप हे उद्धवसेनेतच होते, मात्र, गेल्याच वर्षी तनुजा घोलप यांनी भाजपत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक बबनराव घोलप हे उद्धवसेनेत असले तरी त्यांची नाराजी वाढत गेली आणि नंतर त्यांनी आधी उपनेतेपदाचा आणि नंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आपण भाजप किंवा शिंदेसेनेत प्रवेश करू, असे त्यांनी जाहीर केले असले तरी निर्णय घेतला नव्हता. अखेरीस शनिवारी (दि.६) त्यांनी शिंदेसेनेची निवड केली. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीन सदस्य तीन पक्षांत आहेत. अर्थात सत्ता कुठेही गेली तरी घरातच राहील, अशी देखील चर्चा त्यानिमित्ताने राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नयना घोलप यांची भूमिका स्पष्ट नाही
महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असताना बबनराव घोलप यांच्या कन्या नयना घोलप यांनी महापौरपद भूषवले होते. आता त्यांच्या घरातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांत असले तरी माजी महापौर नयना घोलप यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

Web Title: Three parties in the same house! Babanrao Gholap in Shiv Sena, son Yogesh Gholap in Shiv Sena UBT, daughter tanuja Gholap in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.