बटन धनुष्यबाणाचे दाबतोय, लाईट कमळासमोरची पेटतेय...; नाशिकमध्ये शिंदेसेना बुचकळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:55 IST2026-01-15T13:55:43+5:302026-01-15T13:55:54+5:30
Nashik Election Ward 24 EVM Issue: नाशिकमधील गोविंदनगर भागातील ग्रामदेव प्राथमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बटन धनुष्यबाणाचे दाबतोय, लाईट कमळासमोरची पेटतेय...; नाशिकमध्ये शिंदेसेना बुचकळ्यात
नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज प्रभाग क्रमांक २४ मध्ये मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप हे युतीत असले तरी, या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत किंवा स्थानिक वादातून गंभीर आरोप समोर आले आहेत. "ईव्हीएमवर धनुष्यबाणाचे बटन दाबल्यानंतर भाजपच्या चिन्हापुढील लाईट लागत आहे," असा खळबळजनक दावा शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. पुनम महाले यांनी केला आहे.
नाशिकमधील गोविंदनगर भागातील ग्रामदेव प्राथमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील मतदार गिरीश शिरवाडकर यांनी तक्रार केली की, त्यांनी एका चिन्हाला मत दिले असता दुसऱ्याच चिन्हाचा लाईट लागला. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.
तक्रारदारांना धमकवल्याचा आरोप डॉ. पुनम महाले यांनी केवळ मशीनमधील बिघाडाचाच आरोप केला नाही, तर प्रशासनावरही निशाणा साधला आहे. "ज्या मतदारांनी या गैरप्रकाराबाबत लेखी तक्रार केली, त्यांना केंद्रावर धमकवण्यात आले," असा आरोप त्यांनी केला आहे. या गोंधळामुळे केंद्रावरील मतदान काही काळ विस्कळीत झाले होते.
निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप फेटाळले असून, ईव्हीएममध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे प्राथमिक स्तरावर स्पष्ट केले आहे. मात्र, शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे या प्रभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.