'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:15 IST2026-01-09T13:15:04+5:302026-01-09T13:15:25+5:30
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महिला मतदारांचा कौल जिंकण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
नाशिक : महापालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महिला मतदारांचा कौल जिंकण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. विशेषत्वे 'लाडकी बहीण' योजनेच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांकडे निर्णायक मतदार म्हणून पाहिले जात असून त्याच अनुषंगाने महिला स्टार प्रचारकांच्या फौजा नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
महापालिका निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवत प्रचाराची रणनीती आखली आहे. विशेषतः 'लाडकी बहीण' मतदारांच्या मतांकडे डोळा ठेवत, विविध पक्षांकडून महिला स्टार प्रचारकांच्या सभा आणि रोड शोचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत शहरात चौक सभा आणि रोड शोचा धडाका होईल
नाशिक शहरात महिला मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने, सर्व पक्षांचे प्रचाराचे गणित महिलांभोवतीच फिरताना दिसत आहे. महिलांसाठी राबवलेल्या योजना, आर्थिक मदत, सुरक्षितता, महागाई, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर प्रचारात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. प्रत्येक उमेदवार आपली भूमिका महिलांसाठी कशी उपयुक्त आहे, हे ठसविण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत नाशिक शहरात चौक सभा आणि रोड शोचा धडाका उडणार आहे. शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये सभा पदयात्रा आणि रोड शो आयोजित करण्यात आले असून, त्यामुळे वाहतूक कायदा व सुव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
नाशिक महापालिका निवडणुकीत महिला मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, यावरच सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळेच महिला स्टार प्रचारकांच्या सभांमधून होणारे संदेश, आश्वासने आणि राजकीय आक्रमकता या निवडणुकीचा निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
यांची होणार सभा
भाजपाकडून मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून आमदार सना मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून खासदार सुप्रिया सुळे, तर काँग्रेस पक्षाकडून खासदार शोभा बच्छाव या प्रचाराच्या रणांगणात उतरल्या असून, त्यांच्या सभा व रोड शोद्वारे महिला मतदारांना थेट साद घातली जाणार आहे.
परवानग्यांसाठी धाव
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये सभा व रोड शोसाठी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच, पोलिस ठाण्यांमध्येही चौक सभा व रोड शोच्या परवानगीसाठी उमेदवार, कार्यकर्ते मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, आवश्यक त्या अटी व नियम घालण्यात येत आहेत.