Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:13 IST2026-01-13T13:12:07+5:302026-01-13T13:13:14+5:30
Nashik Municipal Election 2026 And Girish Mahajan : तपोवनात अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारणार असल्याची घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने हजारो कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे नाशिक शहराचा संपूर्ण कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे तपोवनात अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारणार असल्याची घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
सिडकोतील पवननगर मैदानात सिडकोतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मंत्री महाजन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, भाजप नेते सुधाकर बडगुजर, माजी नगरसेविका रत्नमाला राणे डॉ. संदीप मंडलेचा, प्रकाश चकोर, केतन अवसरकर आदी उपस्थित होते. सध्या गाजत असलेल्या विषयांचा संदर्भ घेत महाजन म्हणाले की, साधू ग्रामसाठी तपोवनातील झाडेही तोडली जाणार असल्याचे विरोधकांकडून वारंवार बोलले जात असले तरी कुंभमेळानिमित्त सुमारे १५७ हजार नवीन झाडे लावली जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
नाशिक शहर है धार्मिक पौराणिक व आध्यात्मिक शहर म्हणून ओळख असलेली नगरी असून या ठिकाणी आता एज्युकेशन हबदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ आता नाशिक शहराकडे येणाऱ्यांचा कल वाढला आहे. आगामी काळात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जाणार असून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होण्याबरोबरच बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी विविध उपाययोजना व नवनवीन कारखाने या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले. सुंदर नाशिक हरित नाशिक ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवत येत्या वर्षभरात नाशिक शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे.
नाशिक शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्तेदेखील संपूर्ण सिमेंट कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहेत. याबरोबरच शहर विकासाच्या दृष्टीने नवनवीन योजनादेखील राबविल्या जाणार आहेत, याचा नाशिककरांना फायदा होणार आहे. शहरातील महत्त्वाचा वाहतूककोंडीचा प्रश्न हादेखील निकाली काढण्यात येणार आहे, असेही महाजन शेवटी म्हणाले.
त्रिमूर्ती चौकात होणार उड्डाणपूल
यावेळी मंत्री महाजन पुढे बोलताना म्हणाले की, सिडको भागातील रस्ते तसेच उच्चदाबाच्या वीज तारा भूमिगत करणे असो या भूमिगत गटार योजनेचे काम असो ही सर्व कामे येत्या काळात पूर्ण करण्याबरोबरच संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौक भागात उडाणपूल उभारण्यासाठी तत्काळ तरतूद करणार असल्याचे आश्वासनही मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.
कामे अडणार नाहीत
मागील कुंभमेळ्याला मी पालकमंत्री होतो, मात्र आता पालकमंत्री नाही. असे असले तरी काही बिघडत नाही. यामुळे कोणतेही काम अडणार नाही. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरात कोट्यवधी भाविक दाखल होणार असून संपूर्ण कुंभमेळा हा २०१२ मध्ये यशस्वी करण्यात आला होता त्याच पद्धतीने आतादेखील यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ठाकरे बंधूंवर टिप्पणी
नाशिक शहरात नुकतीच उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांची सभा पार पडली. या सभेमध्ये ठाकरे यांनी गिरीश महाजन यांना तपोवनातील झाडे तोडत असल्याच्या निमित्ताने लाकूडतोड्या ही पदवी दिली. यावरून उत्तर देताना गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना उद्देशून या दोघांची जोडी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल असे आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.