Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:01 IST2026-01-11T12:00:19+5:302026-01-11T12:01:16+5:30
Nashik Municipal Election 2026 And Eknath Shinde : मागे कुणी तरी दत्तकनाशिकची घोषणा करून गेले. मात्र, आमचा अजेंडा विकासाचा आहे. जे बोलतो तेच करतो. नाशिकला आई समजून आम्ही नाशिकचा मेकओव्हर करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
नाशिक: मागे कुणी तरी दत्तकनाशिकची घोषणा करून गेले. मात्र, आमचा अजेंडा विकासाचा आहे. जे बोलतो तेच करतो. नाशिकला आई समजून आम्ही नाशिकचा मेकओव्हर करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत दिली.
अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारी (दि. १०) रात्री शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), रिपब्लिकन सेना युतीची जाहीर सभा झाली. त्यावेळी शिंदे यांनी नाशिककरांसाठी घोषणांचा पाऊस पाडला. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सुहास कांदे, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, उपनेते विजय करंजकर, विलास शिंदे, अमन आंबेडकर, आदी उपस्थित होते.
सत्तेवर आलो तर मुंबईप्रमाणेच नाशिकमधील ५४० चौरस फुटांच्या घरांना घरपट्टी माफीची घोषणादेखील शिंदे यांनी केली. तपोवनातील वृक्षतोडीवर पर्यावरणपूरक कुंभमेळा करायचा आहे, याविषयी जे तुमच्या मनात ते आमच्याही मनात असे सांगून वृक्षतोडीला विरोधच केला. ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, असे सांगून शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपासून हे गणित दृढ झालय, नगरपरिषद निवडणुकीतही परिस्थिती होती, असे सांगून विजयाचा हाच स्ट्राईक रेट कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिककरांना दिलेली आश्वासने
गोदावरीला प्रदूषणमुक्त करायचे आहे.
शहरातील ५४० चौरस फुटांच्या घरांची घरपट्टी माफ करू
पुण्याप्रमाणे ९ मीटर रस्त्यावर ३० मीटरपर्यंत इमारतीला परवानगी देऊ
ठाण्याप्रमाणेच वाढीव ५० टक्के एफएसआय देऊ
सिडकोची घर फ्रिहोल्ड करू, कुंभ मेळा भव्यदिव्य करू
सेंट्रल पार्क, शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणार
उद्योग व्यवसायला अधिकची जागा देऊ, रोजगार निर्मितीला प्राधान्य
बाळासाहेब ठाकरे दवाखाने वाढविण्यासाठी निधी देणार
कुंभमेळा यशस्वी करायचा असून, निधीची कमतरता पडू देणार नाही.
उद्योग-व्यवसायाला अधिकची जागा देऊन रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
आमचे बिनविरोध आले; तुमचे काय दुखते?
आमचे काही नगरसेवक बिनविरोध निवडून आले, म्हणून काही लोक चिंता करत आहेत. विरोधी गटातील उमेदवारांनी माघार घेतली म्हणून बिनविरोध आले. तुम्हाला जाब विचारायचा असेल तर तुमच्या उमेदवाराला विचारला पाहिजे, आम्हाला कशासाठी विचारता? असा प्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावरून टीकास्त्र
एकनाथ शिंदे म्हणाले की, ही प्रचाराची सभा नाही, ही विजयाची सभा आहे. कुंभमेळ्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा सुंभमेळा काल याच पटांगणावर झाला, ठाकरे बंधू २० वर्षानी अस्तित्वासाठी एकत्र आले, कारण आपले पुढील ३० वर्षांनी काय होईल, याची चिंता त्यांना आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव व राज ठाकरे यांना लगावला.
युती फिस्कटल्याने भुसेंचा भाजपवर हल्ला
नाशिकला भाजपाने शिंदे सेनेशी ऐनवेळी युती न करण्याचा निर्णय घेतला. त्याचा समाचार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला, ते म्हणाले की, मोठा भाऊ असलेल्या पक्षाकडून आपल्या सर्वांना काही अपेक्षा होत्या दुर्दैवाने मोठ्या भावाने मोठ्या भावाची भूमिका पार पाडली नाही. नाशिककरांचा अपमान केला. आम्हाला मतदान करून मतदार याबाबतचा राग व्यक्त करतील.
'नाशिक का आशिक' म्हणत गुलाबरावांनी उडविली खिल्ली
मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची खिल्ली उडविली. नाशिक का आशिक मग चर्चा तर होणारच. ते खान्देशी मीदेखील खान्देशी, असे सांगून पाटील यांनी महाजन यांची फिरकी घेतली. आम्ही आमची पोरं मोठी करतो अन् तुम्ही त्यांना पळवून नेता, असे सांगून गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या उमेदवार पळवापळवीच्या राजकारणावरून टीकास्त्र सोडले. तसेच शिंदेसेना - राष्ट्रवादीचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला.
भुजबळांकडूनच नाशिकचा विकास : सुनील तटकरे
राष्ट्रवादी (अजित पवार) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, पायाभूत सुविधा नाशिकमध्ये आमचे ज्येष्ठ सहकारी छगन भुजबळ यांनीच आणल्या. नाशिकमध्ये अनेक प्रकल्प आणून त्यांनी नाशिकच्या विकासात योगदान दिले. आता नाशिकच्या पुढच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास अन् अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे या युतीच्या माध्यमातून नाशिकला भरघोस निधी मिळू शकेल याचा विचार नाशिककरांनी करावा असे नमूद केले.
सर्व नेत्यांनी भाजपवर थेट टीका टाळली
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाव न घेता भाजपावर युतीवरुन टीका केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर तिघे मंत्री, आमदार व प्रमुख नेत्यांनी भाषणात भाजपावर थेट टिका करणे टाळले. तर एकनाथ शिंदे भाषणाच्या शेवटी म्हणाले की, गेली अनेक वर्ष ज्यांची सत्ता या नाशिकमध्ये होती त्यांनी काय केले हे देखील आपलं पाहिलं आहे.