Nashik Municipal Election 2026 : कुंभ पर्वातील वचनात शाश्वत विकासाची ग्वाही; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:00 IST2026-01-09T13:59:43+5:302026-01-09T14:00:34+5:30
Nashik Municipal Election 2026 : भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

Nashik Municipal Election 2026 : कुंभ पर्वातील वचनात शाश्वत विकासाची ग्वाही; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'कुंभ पर्वातील अमृत वचन' या नावाने जाहीरनामा गुरुवारी (दि. ८) प्रसिद्ध करीत शाश्वत विकासाचे वचन दिले आहे. याशिवाय भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची ग्वाही देताना महापालिकेच्या प्रत्येक खर्चाचे लेखापरीक्षण नाशिककरांना करता येईल, याची ग्वाहीही त्यात देण्यात आली आहे. आजचा त्रास सहन करा उद्याचा विकास तुम्हाला दिसेन, असे सांगत खड्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना गोंजारण्याचा प्रयत्नही त्यात करण्यात आला आहे.
भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, शहर सरचिटणीस नाना शिलेदार, सुनील देसाई, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रसिद्धीप्रमुख पीयूष अमृतकर आदी उपस्थित होते. या जाहीरनाम्यात पर्यावरण संरक्षण, पारदर्शक प्रशासन, तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा आणि सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात आला आहे.
नाशिकला स्मार्ट, सुरक्षित व शाश्वत शहर बनवण्याचा संकल्प भाजपने यावेळी व्यक्त केला. ज्या तपोवनातील वृक्षांच्या मुद्द्यावरून भाजपला टार्गेट करण्यात येते आहे, त्याबद्दल या वचननाम्यात कोणताही उल्लेख नाही.
आयटी पार्क, मेट्रोबाबत चुप्पी...
२०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने आयटी पार्क आणि टायरबेस मेट्रोचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही याबद्दल विचारताच शहराध्यक्ष केदार यांनी दोन्ही प्रकल्प पूर्ण होणार असून, ती कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.
जाहीरनाम्यातील प्रमुख विकासकामे
पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सर्व मनपा सेवा ऑनलाइन व सिंगल विंडो प्रणालीतून उपलब्ध, मनपा खर्चाचे ऑनलाइन सार्वजनिक ऑडिट, तक्रार निवारण केंद्र व २४ तास हेल्पलाईन
पायाभूत सुविधा विकास, रस्ते, ड्रेनेज व फूटपाथचे दीर्घकालीन गणवत्तापूर्ण बांधकाम, रिंगरोड फ्लायओव्हर व स्मार्ट चौक, जलनिस्सारण व पावसाळी पाणी वाहिन्यांचे आधुनिकीकरण
शहराची सुरक्षा, सीसीटीव्ही 3 नेटवर्क, नियंत्रण कक्ष व सतत मॉनिटरिंग, रात्रपाळी गस्त वाढवून संवेदनशील भागात सुरक्षा मजबूत, आपत्कालीन परिस्थितीसाठी सिटी रिस्पॉन्स टीम
महिला व ज्येष्ठ नागरिक सुविधा, प्रत्येक प्रभागात सुरक्षित पिंक टॉयलेट्स, महिला सुरक्षा हेल्पडेस्क व स्वसंरक्षण प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सीनियर सिटीझन सेंटर, हेल्थ कार्ड व विशेष बस पास
झोपडपट्टी व सामाजिक विकास, झोपडपट्टी पुनर्विकास, शौचालय, पिण्याचे पाणी व प्रकाश व्यवस्था, कुटुंबनिहाय मूलभूत सुविधा हमी योजना, शिक्षण व आरोग्यासाठी विशेष कार्यक्रम
रोजगार व शिक्षण, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र, स्टार्टअप हबची निर्मिती, मनपा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, ई-लायब्ररी, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग योजना
वाहतूक व पार्किंग, मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्प, स्मार्ट पार्किंग अॅप, नवीन सिग्नल प्रणाली व वन-वे अंमलबजावणी, इलेक्ट्रिक बस सेवा व बसस्टॉपचे आधुनिकीकरण
क्रीडा, पर्यटन व सांस्कृतिक विकास, प्रत्येक प्रभागात ओपन जिम व क्रीडा सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने व मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.
गिरीश महाजन, फरांदे अनुपस्थित...
या अमृत वचनचे प्रकाशन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले. तर आ. देवयानी फरांदे यांनी याही कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने प्रचारप्रमुखांच्या अनुपस्थितीत वचननाम्याचे प्रकाशन करावे लागले.