Nashik Municipal Election 2026 : अखेरच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागासाठी भाजपकडून आता स्वतंत्र सूक्ष्म नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 12:43 IST2026-01-11T12:43:09+5:302026-01-11T12:43:39+5:30
Nashik Municipal Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आता भाजपतर्फे प्रत्येक प्रभागाचे स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.

Nashik Municipal Election 2026 : अखेरच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागासाठी भाजपकडून आता स्वतंत्र सूक्ष्म नियोजन
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आता भाजपतर्फे प्रत्येक प्रभागाचे स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. या काळात स्थानिक स्तरावर त्यांनी घेतलेला आढावा आणि काही कळीचे मुद्दे ते रविवारी येथे येत असलेल्ले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवणार असून, फडणवीस यांच्या सूचनेनुसार अंतिम तीन दिवसांची रणनीती ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक महापालिकेत ठेवलेले १०० प्लसचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाजनांनी येथे डेरा टाकला आहे. या काळात त्यांनी कुठेही जाहीर सभा अथवा कार्यक्रम घेतले नसले तरी ते पक्षातील कळीच्या नेत्यांशी बोलून प्रभागानुसार रणनीती आखत असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे उमेदवारांशी देखील गरजेनुसार वन-टू-वन संवाद साधत त्यांच्याकडून त्या-त्या ठिकाणच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यावरील उपाययोजनांचा कानमंत्र देत असल्याचे समजते.
प्रत्येक प्रभागातील भिन्न स्थिती, तेथील स्थना व मतदारांचा कल लक्षात घेऊन प्रभागनिहाय सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. एकही प्रभाग दुर्लक्षित राहणार नाही, यादृष्टीने प्रत्येक उमेदवाराला बळ दिले जात आहे. त्याचप्रमाणे शहराच्या तीनही विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा महाजन यांच्याकडून शनिवारी घेण्यात आला. यावेळी आ. राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, भाजप नेते रवी अनासपुरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नाराजी दूर करण्यात यश
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी केल्यानंतर इच्छुकांची संख्याही वाढली होती. त्यातच अनेक पक्षांचे सक्षम दावेदार भाजपने घेतल्यानंतर त्या पक्षांची अडवण झाली. मात्र, भाजपतही इच्छुकांची निराशा झाल्याने काहीसे नाराजीचे वातावरण होते. मात्र, सर्वांना आता बरोबर घेऊन महाजन यांनी पक्ष प्रचारात सहभागी होण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.