Nashik Municipal Election 2026 : बडगुजरांची व्यूहरचना यशस्वी; दोन प्रतिस्पर्ध्याची केली कोंडी, 'अशी' होणार लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:56 IST2026-01-03T14:54:40+5:302026-01-03T14:56:27+5:30
Nashik Municipal Election 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर सिडकोतील प्रभाग २५ क मधून हर्षा बडगुजर यांनी तर दीपक बडगुजर यांनी २५ ड मधून माघार घेतली.

Nashik Municipal Election 2026 : बडगुजरांची व्यूहरचना यशस्वी; दोन प्रतिस्पर्ध्याची केली कोंडी, 'अशी' होणार लढत
नाशिक/सिडको - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर सिडकोतील प्रभाग २५ क मधून हर्षा बडगुजर यांनी तर दीपक बडगुजर यांनी २५ ड मधून माघार घेतली. त्यामुळे या दोघा ठिकाणी पुरस्कृत उमेदवार देण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. एकाच कुटुंबातील तिघांनी निवडणूक लढविण्याचे बडगुजर यांचे प्रयत्न यामुळे विफल ठरले. मात्र, तरीही त्यांना शहाणे आणि आमदार सीमा हिरे समर्थकांवर मात केली.
पक्षाचे नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सूचना देऊनही दीपक बडगुजर यांनी प्रभाग २९ मधूनच निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. तर दुसरीकडे मुकेश शहाणेही अपक्ष निवडणूक लढविण्यास ठाम होते. त्यामुळे प्रभाग २५ मधून दीपक बडगुजर यांचा दुसरा उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतला. मात्र, प्रभाग २९ मधून ते भाजपचे अधिकृत उमेदवार राहिले. त्यामुळे आता या प्रभागातून भाजपने विलंबाने उमेदवारी घोषित केलेले मुकेश शहाणे आता बंडखोर म्हणून दीपक बडगुजर यांच्या समोर उभे राहणार आहेत.
दोन एबी फॉर्मचा घोळ
हर्षा बडगुजर व भाग्यश्री ढोमसे यांनी प्रभाग क्रमांक २५ मधील क या गटातून भाजपचा अधिकृत एबी फॉर्म लावून अर्ज भरला होता. मात्र, हर्षा बडगुजर यांना भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. एकाच गटात दोन भाजपचे अधिकृत उमेदवार झाल्याने सहाजिकच भाग्यश्री ढोमसे यांना मात्र अपक्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र पक्षादेशानुसार हर्षा बडगुजर यांना माघार घ्यावी लागली.
आता मुकेश शहाणे -बडगुजर यांच्यात फाइट
प्रभाग क्रमांक २९ मध्ये मुकेश शहाणे यांच्या उमेदवारीची अडचण झाल्यानंतर याच प्रभागातील भाजपाच्या अन्य उमेदवारांनी मुकेश शहाणे यांचा फोटो त्यांच्या प्रचार पत्रकावर प्रसिद्ध करून त्याचे वाटप करण्याचे ठरले होते. भाजप त्यांना पुरस्कृत करेल, अशी अपेक्षा होती. मात्र दीपक बडगुजर यांनी याच प्रभागातून निवडणूक लढण्याचा हट्ट केल्याने अखेरीस ही योजना बारगळली. आता मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर यांच्यातच लढत होईल, असे दिसते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनंतर मुलगा पत्नीने प्रत्येकी एका ठिकाणाहून माघार घेतली. मुकेश शहाणे हे आमच्याच पक्षाचे असून त्यांच्यावर एबी फॉर्म भरताना झालेल्या प्रकरणामुळे अन्याय झाला आहे. येणाऱ्या काळात त्यांचेसाठी मी स्वतः प्रयत्न करेल. अपक्ष उमेदवारी ठेवायची की नाही? हे त्यांनीच ठरवावे.
सुधाकर बडगुजर, भाजप
प्रभागातील जनता सुज्ञ आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. कोणास निवडून द्यायचे याचा निर्णय मतदारच घेतील. पक्षाच्या भूमिकेबाबत मी आताच काही बोलणार नाही.
मुकेश शहाणे, अपक्ष
अशी होणार लढत
२९ अ या प्रभागात भाजपाचे दीपक बडगुजर, शिंदेसेनेचे जनार्दन नागरे तसेच आम आदमी पार्टीचे गोविंदा कोरडे तर अपक्ष म्हणून मुकेश शहाणे या चार उमेदवारांत लढत होईल.