Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:37 IST2025-12-30T13:36:03+5:302025-12-30T13:37:44+5:30
Nashik Municipal Corporation Election : नाशिकमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी युती तसेच महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
नाशिक : महापालिकेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढू असे महायुतीचे नेते वारंवार घोषित करीत असले तरी नाशिकमध्ये मात्र भाजपकडून स्वबळाचे नारे दिले होते, परंतु अखेरीस सोमवारी (दि. २९) भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे घोषित केले आणि शिंदेसेना आणि राष्ट्रवादीदेखील एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मनसेला समाविष्ट करण्यावरून खळखळ करणाऱ्या काँग्रेसने स्थानिक पातळीवर अनौपचारिकरीत्या उद्धवसेनेच्या माध्यमातून मनसेला साथ दिली आणि महाविकास आघाडी एकत्रितरीत्या लढणार असल्याचे जाहीर केले.
यामुळे आता नाशिकमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी युती तसेच महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर महायुती एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादी (अजित पवार) चे माजी खासदार समीर भुजबळ, अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बैठकदेखील घेतली होती. परंतु, त्यानंतर सुरुवातीला ८२ जागांवर ठाम असणारे गिरीश महाजन यांनी अन्य पक्षांतून माजी नगरसेवक, माजी महापौरांना भाजपत प्रवेश देणे सुरूच ठेवले होते.
या दरम्यान, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर बैठका सुरूच ठेवल्या होत्या. त्यामुळे भाजप स्वबळ आणि शिंदेसेना-राष्ट्रवादी यांची युतीची औपचारिक घोषणा करणेच बाकी होते. सोमवारी (दि. २९) सायंकाळी गिरीश महाजन यांनी अद्याप वरिष्ठ पातळीवर निर्णय व्हायचा आहे असे सांगितले असले तरी मंत्री नरहरी झिरवाळ, दादा भुसे आणि समीर भुजबळ यांनी गोविंद नगर येथील एका हॉटेलमधील बैठकीनंतर ही निवडणूक शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र लढवणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात दोन दिवसांपासून चर्चाना वेग आला असला तरी मध्येच राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेनेत मतभेद होते, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वरिष्ठ पातळीवरून दिलेल्या सूचना, खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि सुनील भुसारा यांच्यातील चर्चा, यानंतर जागा वाटपावर समेट झाल्याचे उद्धवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमध्ये उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि मनसे असे एकत्रित समीकरण असणार आहे.
दोन प्रभागांबाबत वाटाघाटी
शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि. २०) रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. त्यात साधारणपणे ८० ते ८३ जागा शिंदेसेना तर ३३ ते ३५ जागा राष्ट्रवादी असा निर्णय झाला आहे. वंचित किंवा रिपाई गटाला देण्यात येणाऱ्या जागा या शिंदेसेनेच्या कोट्यातून दिल्या जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून
समजते. बैठकीत प्रामुख्याने ९आणि १३ या प्रभागांबाबत वाटाघाटी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत देखील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे काही इच्छुकांचे इनकमिंग सुरूच होते. त्यामुळे काही पॅनल मधील जागांसाठी दोन्ही पक्ष ठाम असल्याने हा तिढा सोडविण्यासाठी मंगळवार सकाळपर्यंतपर्यंत निर्णय लांबण्याची शक्यता आहे.
भाजपकडून ही नावे निश्चित
भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर सोमवारी (दि. २९) उत्तररात्री उशिरा भाजप नेते गिरीश महाजन, निवडणूक सहप्रभारी आमदार एड. राहुल ढिकले आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यात बैठक सुरू होती. एका फार्म हाऊसवर झालेल्या या बैठकीत ज्या जागांवर पक्षाने उमेदवार निश्चीत केले आहेत. त्यांचे एबी फॉर्म तयार करण्याचे काम सुरू होते. ज्या जागांवर अद्याप एकमत नाही त्याबाबत मंगळवारी सकाळी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
भाजपने ज्यांची उमेदवारी निश्चित केली त्यात प्रामुख्याने हिमगौरी आडके, योगेश हिरे, वर्षा भालेराव, स्वाती भामरे (प्रभाग ७), प्रभाग १२ मध्ये शिवाजी गांगुर्डे, नुपूर सावजी, राजू आहेर आणि श्रीमती येवले यांचा समावेश असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून समजली. याशिवाय विजय साने यांचे पुत्र अजिंक्य व सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या यांनाही उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते.
प्रभाग १३ मध्ये बिग फाइट
भाजपमध्ये ऐनवेळी झालेले प्रवेश, त्यामुळे व्यक्त झालेली नाराजी, मंत्री महाजन यांना घातला गेलेला घेराव अशा नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या प्रभाग १३ मध्ये भाजपकडून अखेर शाहू खैरे, बबलू शेलार, विनायक पांडे यांच्या स्नुषा आदिती आणि यतिन वाघ यांची पत्नी अशा चौघांचे पॅनल निश्चित झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. तर येथे विरोधात चारही जागा शिंदे सेना लढवणार असून गणेश मोरे, रश्मी भोसले, दीपक डोके यांची नावे जवळपास निश्चित झाली असून चौथ्या नावावर मंगळवारी सकाळी शिक्कामोर्तब होणार असल्याचे कळते.