Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:56 IST2025-12-30T13:55:06+5:302025-12-30T13:56:33+5:30
NMC Election 2026: फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता, तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधून ओबीसी महिला याच प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता

Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार
नाशिक: भाजपच्या प्रदेश नेत्यांनी कोणत्याही आमदारांच्या मुला-मुलींना उमेदवारी दिली जाणार नाही, असे जाहीर केले असून, तसे फोनही पक्षाच्या नेत्यांना आल्याने आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य आणि आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे-बेंडाळे यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. हे दोघेही माघार घेतील, असे दोन्ही आमदारद्वयींनी सांगितले.
आमदार फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता, तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधून ओबीसी महिला याच प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. या दोघांनीसुद्धा गेल्या दोन ते तीन वर्षापासून तयारी करून जनसंपर्क वाढवला होता. परंतु आता सोमवारी (दि. २९) अर्ज दाखल केल्यानंतर ऐनवेळी हा निर्णय कळविण्यात आल्याने या दोघांची उमेदवारी अडचणीत आली आहे. अर्थात, पक्षाने अगोदर याबाबत सूचना केली असती तर अधिक सोयीचे झाले असते,एकीकडे पक्षात दोन दिवसांपूर्व प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आणि दुसरीकडे मात्र तीन टर्म आमदार असलेल्यांच्या मुलांची उमेदवारी रद्द करण्यात आल्यान समर्थकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षाने दिलेले आदेश मान्य आहेत. रश्मी बेंडाळे-हिरे आणि अजिंक्य सुहास फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी ते मागे घेतील असे आमदार सीमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.
काय होतील परिणाम?
प्रभाग ७ : भाजपाच्या दृष्टीने सुरक्षित होता. आता अजिंक्य फरांदे यांच्या ऐवजी येथे वर्षा भालेराव यांना उमेदवारी मिळू शकेल, हिमगौरी आडके, योगेश हिरे आणि स्वाती भांमरे या प्रभागात सक्षम दावेदार आहेत.
प्रभाग ८: या प्रभागात शिंदेसेनेचे चार माजी नगरसेवक पुन्हा उमेदवारी करतील, रश्मी हिरे यांनी उमेदवारी केली असती तर शिंदेसेनेला अडविता आले असते. मात्र, आता तसे राहिले नाही. अकारण प्रचार करावा लागला नसत अशी प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केल आहे.