Nashik: शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:19 IST2026-01-03T16:16:17+5:302026-01-03T16:19:41+5:30
Nashik Municipal Corporation Election: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिंदेसेनेतील एका इच्छुक उमेदवाराने पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिल्याने एकच खळबळ माजली.

Nashik: शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील इच्छुक उमेदवार शिवा तेलंग यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पत्र लिहून पक्षातील दिग्गज नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात माजी नगरसेवक सुदाम ढेमसे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. २०२२ पासून प्रभाग ३१ मध्ये सक्रिय असूनही केवळ राजकीय वापर करून घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, २९ तारखेला कॅनडा कॉर्नर येथे एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एबी फॉर्मसाठी पैशांची मागणी करण्यात आली आणि पैसे घेऊनच फॉर्म देण्यात आले. एकाच प्रभागात दोन जणांना एबी फॉर्म दिल्याने संभ्रम निर्माण झाला. हेमंत गोडसे, विजय करंजकर, जयंत साठे, राजू लवटे, आणि प्रवीण बंटी तिदमे यांसारख्या नेत्यांचा या प्रक्रियेत सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशाला फेटाळण्यात आले, असेही ते म्हणाले.
पुढे शिवा तेलंग म्हणाले की, "मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे. माझ्या आत्महत्येस सुदाम ढेमसे, विजय करंजकर, हेमंत गोडसे यांच्यासह आठ नेते जबाबदार राहतील," असाही उल्लेख तेलंग यांनी आपल्या पत्रात केला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून शिवा तेलंग आणि त्यांची पत्नी कोणाच्याही संपर्कात नाहीत. यामुळे पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच या प्रकरणामुळे शिंदेसेनेतील तिकीट वाटप प्रक्रिया आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.