Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:30 IST2026-01-01T12:30:16+5:302026-01-01T12:30:49+5:30
Nashik Municipal Corporation Election : नाशिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या 'राड्या'चे साइड इफेक्टस भाजपला जाणवू लागले आहेत.

Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात
नाशिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या 'राड्या'चे साइड इफेक्टस भाजपला जाणवू लागले आहेत. अतिरिक्त एबी फॉर्म वाटल्या गेलेल्या ठिकाणांपैकी सिडकोत एकूण चार भाजप उमेदवारांबाबत घोळ झाला आहे. परिणामी प्रभाग २५ मध्ये उद्धवसेनेतून भाजपत आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांची पत्नी हर्षा व मुलगा दीपक यांचे एबी फॉर्म अगोदर मिळाल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत, तर याच प्रभागात भाजपने एबी फॉर्म दिलेल्या भाग्यश्री ढोमसे व पुष्पलता पवार यांना अधिकृत उमेदवारीपासून वंचित राहावे लागले आहे. असाच प्रकार प्रभाग २९ मध्ये मुकेश शहाणे आणि प्रभाग २४ मध्ये सुरेखा नेरकर यांच्याबाबतही झाला आहे. परिणामी, या ठिकाणची समीकरणे येत्या काळात बदलणार आहेत.
एबी फॉर्म वाटपाप्रसंगी झालेल्या राड्याच्या पाठोपाठ बुधवारी, उघडकीस आलेल्या या प्रकाराने भाजपची पुरती शोभा झाली असून, अंतर्गत वाद चव्हाटचावर आले आहेत. भाजप आमदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारदेखील केली असून, वरिष्ठ पातळीवर यावरून चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गदारोळातच वाटले होते एबी फॉर्म...
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबई-आग्रा रोडवरील एका फार्म हाउसमधून एबी फॉर्म वाटपाचे काम सुरू असताना काहींनी त्याचा ताबा घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) आमदार सीमा हिरे यांनी फार्म हाउसवर धडक दिली. तिथे झालेला राडा, तोडफोड, एकमेकांच्या वाहनांचा सिनेस्टाइल पाठलाग अशा नाट्यानंतर अखेर आ. हिरे यांनी आपल्या समर्थकांना एबी फॉर्म मिळवून दिले. मात्र, या सगळ्या गदारोळात पक्षाचे अतिरिक्त एबी फॉर्म वाटले गेले. परिणामी, एकाच जागेसाठी दोन दोन उमेदवारांनी पक्षाचे एबी फॉर्म जोडल्याचे छाननीत समोर आले. अशा स्थितीत ज्याचा अर्ज अगोदर दाखल होईल, तो अधिकृत धरला जात असल्याने बडगुजर परिवाराला त्याचा सर्वाधिक लाभझाला आहे, तर मुकेश शहाणे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पलता पवार व सुरेखा नेरकर यांना फटका बसला आहे.
बुधवारी छाननी वेळी अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यात प्रभाग २९ मध्ये एकेकाळी बडगुजर उद्धवसेनेत असताना त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या मुकेश शहाणे यांच्या जागेवर आपल्या मुलगा दीपक बडगुजर यांना अगोदर उमेदवारी अर्ज दिल्याने शहाणे यांचा अर्ज बाद झाला. दीपक बडगुजर यांचे मात्र प्रभाग २५ आणि २९ असे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता दीपक यांनी एका ठिकाणाहून माघार घेतली तरी त्या जागेवर पक्षाचे चिन्हे नसेल व कोणाला तरी पुरस्कृत करावे लागेल, अशी स्थिती आहे.
शहाणे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अपक्ष म्हणून रिंगणात राहाण्याचा तसेच अशा प्रवृत्तींचा बीमोड करण्याचा इरादा जाहीर केला आहे, तर बडगुजर यांनी मात्र आपण नियमानुसार पक्षाचे अधिकृत फॉर्म भरल्याचे स्पष्ट केले आहे. या सगळ्या घोळामध्ये आता प्रभाग २५ मधून स्वतः सुधाकर बडगुजर तसे त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगा दीपक बडगुजर असे एकाच परिवारातील तीन उमेदवार झाले आहेत. भाजपच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे.