Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:41 IST2025-12-31T13:40:33+5:302025-12-31T13:41:46+5:30
Nashik Municipal Corporation Election : काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना उमेदवारी दिली आहे.

Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
नाशिक: गेल्या आठ वर्षांपासून महापालिका निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना यंदा संधी दिसली खरी, परंतु भाजपने निवडून येण्याची क्षमता तसेच निवडणूक सर्व्हेच्या नावाखाली आपल्याच पक्षाच्या अनेक माजी नगरसेवक आणि निष्ठावानांना डावलले आणि निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ऐनवेळी आलेल्यांना संधी दिली.
पक्ष कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे काही इच्छुकांना तर पक्षातील मुलाखतीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली.
१२२ जागांसाठी २,३५७ अर्ज
नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठी २३५७ ऐवढे उच्चांकी उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी भाजपाने सर्वाधिक ११८, उमेदवार दिले असले तरी प्रभाग १४ मध्ये या पक्षाला एकही उमेदवार देता आलेला नाही.
महापालिकेच्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी स्वबळाची तयारी केली असली तरी युती आणि आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भाजपने सुरवातीपासूनच स्वबळाची भाषा केली होती. त्यानुसार सर्वाधिक उमेदवार या पक्षाने दिले आहे.
भाजपत आले अन् तिकीट घेतले
भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या अन्य पक्षांतील माजी नगरसेवक तसेच या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
१) खंडू बोडके २) नीलम नरेश पाटील ३) गुरूमितसिंग बग्गा ४) मनीष सुनील बागुल ५) प्रशांत दिवे ६) उषा बेडकोळी ७) दिनकर पाटील ८) अमोल दिनकर पाटील ९) मानसी योगेश शेवरे १०) राजेंद्र महाले ११) सुधाकर बडगुजर १२) दीपक सुधाकर बडगुजर १३) कल्पना चुंभळे १४) कैलास चुंभळे १५) योगीता अपूर्व हिरे १६) अदिती ऋतुराज पांडे १७) हितेश यतीन वाघ १८) राहुल (बबलू) शेलार १९) शाहू खैरे २०) सचिन मराठे २१) डॉ. सीमा ताजणे २२) शाम गोहाड.
कोणाचे किती उमेदवार
- भाजप ११८
- उद्धवसेना ८२
- शिंदेसेना ८०
- राष्ट्रवादी (अजित पवार) ४१
- मनसे ३४
- राष्ट्रवादी (शरद पवार) ३१
इतरांची एका तिकिटासाठी झुंज, यांना मात्र दोन तिकिटे
भाजपमध्ये तीस-चाळीस वर्षे काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला. तरीही त्यांना उमेदवारी मिळत नाही. मात्र, या निवडणुकीत तीन घरात दोन-दोन उमेदवारी देण्यात आली आहे. यात सुधाकर बडगुजर व त्यांचे पुत्र दीपक बडगुजर, कल्पना चुंभळे व त्यांचे दीर कैलास चुंभळे तसेच दिनकर पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल पाटील अशा एकाच कुटुंबातील दोनजणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
शिंदेसेनेत आले अन् पावन झाले
शिंदेसेनेत १९ तर उद्धव सेनेतून ९ आयात उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग २२ मधून शिंदेसेनेकडून वैशाली दाणी यांना उमेदवारी मिळाली. त्या शिंदेसेनेतून पक्षात आल्या. राष्ट्रवादी (अजित पवार) तून शिंदेसेनेत आलेले कैलास मुदलीयार यांना पक्ष प्रवेशाचा लाभझाला. माजी नगरसेविका शीतल भामरे या भाजपाच्या पदाधिकारी होत्या. त्यांनी ऐनवेळी शिंदेसेनेत प्रवेश करत प्रभाग २० मधून उमेदवारी मिळविली. प्रभाग २५ मधून अमोल नाईक यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली. ते राष्ट्रवादी (अजित पवार) कडून इच्छुक होते. मोनिका वराडे या भाजपकडून प्रभाग २९ मधून इच्छुक होत्या. त्यांना उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळाली.
कमलेश बोडके प्रभाग ५ मधून भाजपकडून इच्छुक होते. मात्र, त्यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली. भाजपवर नाराज झालेल्या प्रभाग क्रमांक ९ मधील प्रेम पाटील यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली.
पंचवटीतील माजी नगरसेवक दामोदर मानकर, सुनिता पिंगळे यांना भाजपाने उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिंदे सेनेतून उमेदवारी मिळविली. कविता कर्दक या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका होत्या, त्यांना शिंदे सेनेकडून संधी देण्यात आली. सुनीता शिंदे या राष्ट्रवादी (अजित पवार) गटातून शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्यात आली.