Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:52 IST2025-12-28T12:51:03+5:302025-12-28T12:52:45+5:30
Nashik Municipal Corporation Election And Aaditya Thackeray : तपोवनप्रश्नी उद्धवसेनेने केलेल्या आंदोलनाबद्दल आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची पाठदेखील थोपटली.

Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
नाशिक : निम्मे शहर खोदून ठेवले आहे. त्यामुळे नाशिककरांचा शहरातला प्रवास अडथळ्यांचा झाला आहे. शहर खड्डेमुक्त होण्यासाठी निवडणुकीची वाट पाहिली जात होती का? याशिवाय तपोवनातील वृक्षवेली नाशिकचा श्वास असून, १७०० डेरेदार वृक्षांवर कुन्हाड चालविण्याचा विचार सत्ताधाऱ्यांच्या मनात येतो तरी कसा? या दोन प्रश्नांची उत्तरे निवडणुकीच्या आखाड्चात आपण स्वतः मागायची आहेत, असे स्पष्ट निर्देश उद्धवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना स्वतंत्र झालेल्या चर्चेत दिल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
तपोवनप्रश्नी उद्धवसेनेने केलेल्या आंदोलनाबद्दल ठाकरे यांनी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची पाठदेखील थोपटली. तपोवनाचा मुद्दा निवडणुकीत तापत ठेवण्याचा इरादा असल्याची जाणीव यावरून प्रकर्षाने होते. आदित्य ठाकरे यांची तपोवनातील भेट अन् पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या मुद्द्यावरून दिलेली दिशा, यावरून प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणार आहेत.
आदित्य ठाकरे यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये तसेच विहितगावला पक्षाचा मेळावा झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत खासदार राजाभाऊ ज्येष्ठ नेते दत्ता वाढ़ो, गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख प्रथमेश गिते उपस्थित होते. नंतर ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतदेखील जागा वाटपावरून चर्चा केली. तपोवनातून जेव्हा आदित्य ठाकरे विहितगावला मेळाव्यासाठी निघाले, तेव्हा त्यांच्या कारमध्ये दत्ता गायकवाड, डी. जी. सूर्यवंशी होते. या प्रवासातही मविआबाबत चर्चा झाली.
आज नाशिकमधील तपोवन येथे भेट देऊन पर्यावरण प्रेमी, स्थानिकांशी संवाद साधला. तसेच 'जागरूक नाशिककर नागरिक' व इतर पर्यावरणप्रेमी संघटना, स्थानिकांनी दिलेले निवेदन स्वीकारले.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 27, 2025
तपोवन- ‘green zone’ नष्ट करून तेथे 'yellow zone' उभारण्यास पर्यावरण प्रेमींसोबत स्थानिकांचाही स्पष्ट विरोध… pic.twitter.com/WpLMG9iYDy
'त्या' एका प्रभागाचा विचार करू नका
विनायक पांडे, यतिन वाघ यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपत प्रवेश केला. मात्र, त्यामुळे घाबरून जाऊ नका, ते त्या एकाच प्रभागातील इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाच्या दृष्टीने संपूर्ण नाशिकच्या राजकारणावर फरक पडणार नाही, असे म्हणून आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न स्वतंत्र चर्चेत केला. ठाकरे यांनी चर्चेत पक्षाची आघाडीसोबत लढण्याची रणनीती ठरवत एकसंघ बनून निवडणूक लढा, असा संदेश दिला.
भाजपराज म्हणजे जंगलराज
भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी झाली असून, पंचवटीतील तपोवन अत्यंत आल्हादायक असून, साधुसंत, ऋषिमुनी हे जंगलात व दाट झाडीझुडपांत ध्यानस्थ बसतात. तपश्चर्या ही जंगलामध्ये चालते.
तपोवनातील झाडे तोडणारे-कापणारे रावण असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. प्रभू रामचंद्राचे नाही तर रावणराज्य भाजप आणत आहे.
तपोवनातील ग्रीन झोन नाशिकचा एक बिल्डर यलो झोन करण्याचे बोलतो. दिल्लीच्या एका कंपनीच्या घशात तपोवन टाकायचा असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. भाजपचे हिंदुत्व म्हणजे चुनावी हिंदुत्व असून भाजपराज म्हणजे जंगलराज असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.