नाशिकच्या जागेबाबत केशव उपाध्येंचे ‘नरो वा कुंजरो वा’

By संकेत शुक्ला | Published: April 17, 2024 10:08 PM2024-04-17T22:08:27+5:302024-04-17T22:08:35+5:30

पक्षात प्रवेश आणि भ्रष्टाचाराचे आरोप या वेगळ्या बाबी असल्याचे स्पष्टीकरण

Keshav Upadhyay's statement on Nashik Lok Sabha | नाशिकच्या जागेबाबत केशव उपाध्येंचे ‘नरो वा कुंजरो वा’

नाशिकच्या जागेबाबत केशव उपाध्येंचे ‘नरो वा कुंजरो वा’

संकेत शुक्ल/नाशिक : महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. नाशिकची जागा जेव्हा केव्हा जाहीर होईल, तेव्हा त्या जागेसाठी सगळे पक्ष प्राणपणाने लढा देतील. उमेदवार कोण असेल हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही, आम्ही केवळ मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच कार्यरत असल्याचे सांगत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उमेदवारीबाबत थेट बोलणे टाळले.

भारतीय जनता पक्षाच्या कार्याबद्दल माहिती देण्यासाठी पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात बुधवारी (दि. १७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्राबाबत त्यांनी यावेळी माहिती देत काँग्रेसवर टीका केली. देशभरातून सुमारे ३० लाख नागरिकांनी केलेल्या सूचनांवर आधारावर संकल्पपत्राचे मुद्दे घेण्यात आले आहेत. सरकार आल्यानंतर त्या संकल्पपत्रावर काम करण्यासाठीचा विचारही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कोणताही आरोप केला तरी सत्य परिस्थिती जनतेला समजते, असेही उपाध्ये म्हणाले. आघाडीसारखे आमच्यात रस्सीखेच नाही. आमच्या नाराजांमधून कोणीही बंडखोर उभा राहणार नाही. त्यामुळे नाशिकमध्ये उमेदवार देण्याला उशीर झाला तरी महायुतीमधील प्रत्येक सदस्य मोदी हे आपले उमेदवार आहेत, असे समजून काम करतील, असेही ते म्हणाले.

पक्षप्रवेश आणि चौकशी हे वेगळे मुद्दे...
अशोक चव्हाण, एकनाथ खडसे यांच्यावर तुम्हीच आरोप केलेत आणि आता तुम्हीच त्यांचा स्वीकार केलात असे विचारले असता उपाध्ये म्हणाले की, भारताला प्रगत राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जात आहोत. त्यामध्ये पक्षप्रवेश आणि चौकशी या दोन वेगळ्या बाबी आहेत. संबंधितांवरील आरोपांची चौकशी सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत येणाऱ्या प्रत्येकाला सोबत घ्यायचे आमचे धोरण आहे. कोणीही आमच्यासोबत आले तरी तपास यंत्रणांचे काम निष्पक्ष सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Keshav Upadhyay's statement on Nashik Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.