मंगळसूत्राचा विषय काढून भाजपकडून महिलांचा अपमान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप

By Suyog.joshi | Published: April 26, 2024 03:20 PM2024-04-26T15:20:06+5:302024-04-26T15:21:46+5:30

काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत हा मुस्लिम लीगचा वचननामा आहे असे वक्तव्य नुकतेच भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला हाेता, त्याचाही निषेध करण्यात आला.

By removing the issue of Mangalsutra, BJP insulted women, Congress office-bearers allege | मंगळसूत्राचा विषय काढून भाजपकडून महिलांचा अपमान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप

मंगळसूत्राचा विषय काढून भाजपकडून महिलांचा अपमान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप

नाशिक : काँग्रेसने समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा जाहीरनामा तयार केला असून त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मंगळसूत्राचा विषय काढून भाजप महिलांचा अपमान करीत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजेंद्र बागुल व शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत हा मुस्लिम लीगचा वचननामा आहे असे वक्तव्य नुकतेच भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला हाेता, त्याचाही निषेध करण्यात आला. भाजपमधील भंडारी हे दुर्लक्षित नेते असून त्यांना अशाच कामांसाठी पाठविले जात असल्याचा आरोप छाजेड यांनी केला. ज्यांनी गेल्या दहा वर्षात काय काम केले यावर भाजप मत मांडू शकत नाही म्हणून आमच्या जाहीरनाम्यावर बोलण्याची वेळ आली आहे असा आरोप काँग्रेसने केला. यावेळी उल्हास सातभाई, डॉ . सुभाष देवरे, वसंत ठाकूर, संतोष ठाकूर आदी उपस्थित होते.

महायुतीला कुठे उमेदवार मिळतोय?
दोन खासदार, तीन आमदार आणि ७० नगरसेवक असूनही भाजपमध्ये एकमत नाही की समन्वय नाही. त्यांच्यातील अशा असमन्वयामुळे नाशिकमध्ये महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नसल्याचा टोला छाजेड यांनी लगावला.

स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष
शहरात स्मार्ट सिटीच्या कामात होत असलेला भ्रष्टाचार, युवा पिढी ड्रग्जकडे वळत आहेत, सर्वे नं. २२ मधील भालेकर मैदान विकायला काढले आहे या स्थानिक प्रश्नांकडे तर भाजपचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे व दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे हे २९ एप्रिल रोजी तर धुळ्याच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या दि. ३० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या शरदश्चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार संजय राऊत नाशिकमध्ये येणार आहेत.

Web Title: By removing the issue of Mangalsutra, BJP insulted women, Congress office-bearers allege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.