Maharashtra Election 2019 : MP Chikhalikar absent to Yuti's gathering | Maharashtra Election 2019 : मनोमिलन मेळाव्याला चिखलीकरांची दांडी
Maharashtra Election 2019 : मनोमिलन मेळाव्याला चिखलीकरांची दांडी

ठळक मुद्देरावण दहनाला चिखलीकरांसोबत कंदकुर्तेुचिखलीकरांना तीन वेळा निमंत्रण

नांदेड : नांदेड उत्तर आणि दक्षिण यापैकी एक आणि लोहा मतदारसंघ भाजपाला सोडवून घेण्याच्या खा़प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्यानंतर सेना-भाजपा युतीत धुसफूस सुरु होती़  त्यातच नांदेड दक्षिणमधून बंडखोरी केलेल्या दिलीप कंदकुर्ते यांना भाजपाच्याच लोकांची फूस असल्याची भावना सेना नेत्यांमध्ये निर्माण झाली होती़ या सर्व अफवा दूर करण्यासाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या मनोमिलन मेळाव्याला खा़प्रताप पाटील चिखलीकर हे अनुपस्थित होते़ तीन वेळेस चिखलीकर यांना निमंत्रण देवूनही ते न आल्याबाबत खा़हेमंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली़ त्यामुळे सेना-भाजपा खासदारातील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे़

महायुतीच्या नांदेड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार आणि युतीतील धुसफूसबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी मल्टीपर्पजच्या मैदानावर मनोमिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ या मेळाव्याला खा़ हेमंत पाटील, भाजपाचे आ़ राम पाटील रातोळीकर, ओमप्रकाश पोकर्णा, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, अजयसिंह बिसेन यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी उपस्थित होते़ परंतु सर्वांचे लक्ष लागलेल्या खा़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र बैठकीला दांडी मारली़ यावेळी खा़ पाटील यांनी बंडखोर दिलीप कंदकुर्तेंचा थेट उल्लेख करीत महायुतीशी गद्दारी करणाऱ्यांना ठोकून काढण्याचा इशारा दिला़ महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचेच दिसून येत आहे़ 

रावण दहनाला चिखलीकरांसोबत कंदकुर्तेु
दसऱ्याच्या दिवशी सिडको भागात भाजपाचे संजय घोगरे यांच्या वतीने रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा़ प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत बंडखोर उमेदवार दिलीप कंदकुर्ते हेही उपस्थित होते़ त्याचबरोबर भाजपाच्या नगरसेवकांनीही यावेळी हजेरी लावली़ चिखलीकर यांनी आपल्या भाषणात दक्षिणेतील रावणाला जाळण्यासाठी आपण आलो असल्याचे सांगितले़ त्याचबरोबर सत्तेची चावी आपल्याकडेच असल्याचे ते म्हणाले़ काँग्रेसचे  माजी उपमहापौर विनय गिरडे पाटील यांच्या कामाचेही चिखलीकर यांनी कौतुक केले़ गिरडे यांना काँग्रेसने वाऱ्यावर सोडल्याची टीका त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

चिखलीकरांना तीन वेळा निमंत्रण
खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना मेळाव्यासाठी तीन वेळा निमंत्रण देण्यात आले़ पाच वेळेस विनंतीही केली़ परंतु ते आले नाहीत़ त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर हे बंडखोर दिलीप कंदकुर्तेच्या प्रचारात असल्याच्या क्लिप आल्या आहेत़ त्याबाबत चिखलीकरांची चर्चा केली आहे़ तसेच प्रवीण चिखलीकर यांना समजावून सांगण्याची विनंती केली आहे़ परंतु शेवटी ज्याची त्याची मर्जी़ आज चिखलीकर आले नाहीत, परंतु मुख्यमंत्र्यांच्या सभेला ते येतील असा विश्वास मला आहे़ असेही खा़ हेमंत पाटील म्हणाले़ आम्ही युती धर्म पाळत उमेदवाऱ्या मागे घेतल्या आहेत़ त्यामुळे भाजपानेही युती धर्म पाळावा़ निवडणुका असल्यामुळे कोण कोणाच्या मागे हे सर्वांना माहीत आहे़ परंतु पाठीवर वार करण्याची आमची प्रवृत्ती नाही़ परंतु अशाप्रकारे कोणी पाठीत खंजीर खुपसत असेल तर त्याला चिरडून टाकू असा इशाराही खा़पाटील यांनी दिला़ 

Web Title: Maharashtra Election 2019 : MP Chikhalikar absent to Yuti's gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.