भाजपचे बंडखोर अर्ज मागे घेणार? नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करणार; महसूलमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:10 IST2026-01-01T17:08:30+5:302026-01-01T17:10:37+5:30
Nagpur : राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.

Will BJP's rebels withdraw their applications? Will hold talks with disgruntled workers; Revenue Minister claims
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. यामुळे पक्षासमोरील आव्हाने वाढली आहेत. अशा सर्व नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल आणि ते बंडखोर अर्ज मागे घेतील असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या विजयासाठी कटिबद्ध आहेत. काही कारणांमुळे नाराज झालेले कार्यकर्तेही शेवटी पक्षासाठीच काम करतील. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सर्वांशी चर्चा करण्यात येणार असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे बावनकुळे म्हणाले. राज्य पातळीवर भाजप–शिवसेना महायुतीचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर अडचणी असल्या तरी पुन्हा एकत्र बसून जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांसाठी समन्वय साधला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. अमरावतीतदेखील अनेकांची नाराजी आहे. परंतु आमदार रवी राणा यांच्याशी स्वतः भेटून चर्चा करणार असून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत, ते अर्ज मागे घ्यावेत अशी विनंती करणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
चंद्रपूर जिल्हाध्यक्षांवरील कारवाई योग्यच
चंद्रपुरातील शहराध्यक्षांवर प्रदेशाध्यक्षांनी केलेली कारवाई योग्य आहे. प्रदेशने मंजूर केलेल्या उमेदवारांच्या यादीत परस्पर बदल करणे अयोग्य असून त्यामुळेच तेथील जिल्हाध्यक्षांना हटविण्यात आले आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे ते म्हणाले.
गुन्हे दाखल असणे व दोष सिद्ध होणे वेगळे
पुण्यात गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याने वाद निर्माण झाला आहे. परंतु केवळ गुन्हा दाखल असणे आणि न्यायालयात दोष सिद्ध होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोष सिद्ध झालेल्या व्यक्तीला भाजप तिकीट देत नाही. सध्या तिकीट दिलेल्या उमेदवारांबाबत न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच भाष्य करता येईल, अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली.