यावेळी मंत्रीपद अडीच वर्षाचेच, मात्र ‘डोन्ट वरी..’ ; पुढे अनेकांना संधी, अजितदादांचा वादा
By नरेश डोंगरे | Updated: December 15, 2024 18:28 IST2024-12-15T18:28:17+5:302024-12-15T18:28:40+5:30
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आणि मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

यावेळी मंत्रीपद अडीच वर्षाचेच, मात्र ‘डोन्ट वरी..’ ; पुढे अनेकांना संधी, अजितदादांचा वादा
नागपूर : मर्यादित मंत्रिपदामुळे योग्यता असूनही एकाच वेळी अनेकांना संधी मिळत नाही. मात्र, डोन्ट वरी, यावेळी मंत्रीपदाचा कार्यकाळ पाच वर्षे ऐवजी अडीच वर्षांचा केला आहे. त्यामुळे अनेकांना संधी मिळेल. एवढेच नव्हे तर अनेक जिल्ह्यांना, विविध भागांनाही विकासाची समान संधी मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीने नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आणि मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर राष्टवादीचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच मेळाव्याच्या आयोजनात महत्वाची भूमिका वठविणारे प्रशांत पवार यांच्यासह अनेक नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्रीपदासाठी अनेक जण हुरपले असले तरी एकाच वेळी सर्वांना संधी देता येणार नाही. परिणामी अनेक जण नाराज होऊ शकतात, हे ध्यानात घेत त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी दादांनी त्यांना पुढच्या अडीच वर्षांचा अप्रत्यक्ष वादा केला. दादा यांनी आपल्या भाषणातून लोकसभा, विधानसभेच्या निकालाचे विश्लेषण करतानाच पक्षाच्या यशापयाशाचाही आढावा घेतला. ते म्हणाले, अपयशाने खचून जायचे नसते. त्यातून धडा घेऊन आपण योग्य ते बदल आत्मसात केले पाहिजे.
लोकसभा निवडणूकीनंतर मी हेच केले. त्याचे चांगले परिणाम समोर आले. आता या यशाचा आलेख असाच वाढवत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीला सामोरे जायचे आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. नेते झाले, मंत्रीपद मिळालं म्हणून कुणी जास्त व्यस्त होत असेल आणि त्यांना पक्ष-संघटनेकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर त्यांच्याबाबतीत नंतर वेगळा विचार होऊ शकतो, असा ईशाराही अजितदादा यांनी दिला. मंत्रीमंडळ अस्तित्वात आल्यावर तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करुन महामंडळाची पदे तात्काळ भरली जाणार आहेत असेही दादांनी सांगितले.
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायचीय...
राज्यात मिळालेल्या यशाने नक्कीच स्फुरण चढले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची आहे. त्यासाठी विदर्भ, मुंबईसह अन्य राज्यातही पक्षाची ताकद वाढवायची आहे, असे सांगतानाच मोर्शीची जागा गेली नसती तर पक्षाचा विदर्भात शंभर टक्के स्ट्राईक रेट राहिला असता, असेही अजितदादा म्हणाले.
पाट्या टाकणे थांबले पाहिजे : प्रफुल पटेल
लोकसभेच्या पराभवानंतर आमदारांना ताकद देण्याचे काम अजितदादा यांनी केले. त्याचमुळे विधानसभेत विदर्भात घसघशीत यश मिळाले. एप्रिल ते मे महिन्यात सर्व निवडणुका पार पडणार आहेत. पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून सर्वांनी काम करण्याची अवश्यकता आहे. पाट्या टाकणे थांबले पाहिजे, नेत्यांसोबत फोटो काढा पण पक्षासाठी योग्य ते कामही करा, अन्यथा वेगळा विचार होईल, असा सज्जड दम पटेल यांनी दिला.
सर्वांची भाकीते खोटी - सुनिल तटकरे
सर्वांची भाकीते खोटी ठरवत चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले. या यशात विदर्भाचा वाटा मोठा असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विदर्भातील कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवली. महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमच्यावर संशय व्यक्त करण्यात आला परंतु आम्ही आजही शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही.