रामटेकमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; मला का घाबरता? बर्वेंचा सवाल
By जितेंद्र ढवळे | Updated: April 4, 2024 21:32 IST2024-04-04T21:31:03+5:302024-04-04T21:32:11+5:30
Ramtek Loksabha Election: लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून रात्रभरात माझे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले असा आरोप रश्मी बर्वेंनी केला.

रामटेकमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; मला का घाबरता? बर्वेंचा सवाल
नागपूर - काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. यानंतर महायुती आणि काँग्रेसने गुरुवारी पत्रपरिषद घेत एकमेकावर आरोप-प्रत्योराप केले. बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र कायद्यानुसार रद्द झाल्याचे रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले तर न्यायालयाने अंतरिम आदेश दिल्याने सत्याचा विजय झाल्याचे सांगत रश्मी बर्वे यांनी भाजपवर तोफ डागली.
काँग्रेस मतदारांची दिशाभूल करतेय, आशिष जयस्वाल यांचा आरोप
रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात किंवा त्यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या प्रक्रियेत भाजप किंवा सेनेचा काडीमात्र संबंध नसल्याचा दावा आ. ॲड. आशिष जयस्वाल यांनी केला. बर्वे यांनी खोटी कागदपत्रे सादर करून जातवैधता प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यामुळे त्यांचे ते प्रमाणपत्र अवैध असल्यासंदर्भात कोराडीचे सुनील साळवे आणि पारशिवनीच्या वैशाली देवीया यांनी जात पडताळणी समितीकडे पुरावे सादर करीत तक्रार दाखल केली होती. मुळात हा वाद साळवे आणि बर्वे यांच्यातील आहे. मात्र, काँग्रेसच्या वतीने यासंदर्भात रामटेक मतदारसंघात संभ्रम पसरविला जात आहे.
बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैध की अवैध, ते ठरविण्याच्या अधिकार हा कायद्यानुसार जातपडताळणी समितीचा आहे. समितीने तो अवैध ठरविला आहे. समितीच्या निर्णयाचा आधार घेत त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला होता. याच्याशी रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे किंवा महायुतीचा काहीही संबंध नाही. पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे उपस्थित होते.
‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’चा जागर करणारे मला का घाबरतात?
‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा जागर करणारे भाजपचे नेते मला इतके का घाबरतात, असा सवाल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी केला. आपला न्यायव्यवस्थेवर आजही विश्वास आहे. मात्र, सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून दोन महिन्यांपासून माझा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप बर्वे यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून रात्रभरात माझे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले. त्याच्या आधार घेत लोकसभेचा उमेदवारी अर्ज रद्द केला. मात्र, आज न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्याचा विजय झाला. मी लोकांत जाऊन काम केले. त्यांचे प्रश्न सोडविले. मात्र, माझ्याविरोधात षडयंत्र रचून मला लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आडकाठी आणण्यात आली. आता माझे पती श्यामकुमार बर्वे येथे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आमची सत्यासाठीची लढाई सुरूच राहील. मात्र, जेव्हा जेव्हा एखाद्या महिलेवर आघात झाले, तेव्हा सत्याचाच विजय झाला आहे. महाभारत, रामायण याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे बर्वे म्हणाल्या. पत्रपरिषदेला काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे, ॲड. शैलेश नारनवरे उपस्थित होते.