पूर्व विदर्भात होणार काट्याच्या लढती, सरळ सामना तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 01:18 PM2024-03-31T13:18:56+5:302024-03-31T13:19:25+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत लढतीचे चित्र शनिवारी स्पष्ट झाले. बसपचा व वंचितच्या एंट्रीमुळे लढती रंजक झाल्या असल्या तरी बहुतेक ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीमध्येच सरळ लढत होत आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Eastern Vidarbha will have a thorny fight, even if it is a straight match... | पूर्व विदर्भात होणार काट्याच्या लढती, सरळ सामना तरीही...

पूर्व विदर्भात होणार काट्याच्या लढती, सरळ सामना तरीही...

नागपूर - पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत लढतीचे चित्र शनिवारी स्पष्ट झाले. बसपचा व वंचितच्या एंट्रीमुळे लढती रंजक झाल्या असल्या तरी बहुतेक ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीमध्येच सरळ लढत होत आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर व भंडारा-गोंदिया या चार मतदारसंघांमध्ये भाजपविरोधात काँग्रेस, तर रामटेक मतदारसंघात शिंदेसेनेची काँग्रेससोबत लढत आहे. तिसऱ्या उमेदवारामुळे मतविभाजनाचा फटका बसू नये, यासाठी भाजप-काँग्रेस दोन्ही पक्ष सावध आहेत.

भाजपसह शिंदेसेनेचाही उमेदवार ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी केलेली तडजोड, नाना पटोलेंनी भंडारा-गोंदियात दिलेला नवखा उमेदवार, चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना करावी लागणारी कसरत, महायुतीचा झेंडा उंचावण्यासाठी प्रफुल्ल पटेलांना करावी लागणारी धडपड, ही या निवडणुकीची वैशिष्ट्ये ठरणार आहेत.

गडचिरोली-चिमूर
गडचिरोली-चिमूरमध्ये पारंपरिक पद्धतीने काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत होत आहे. भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते, तर काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान हे नशीब आजमावत आहेत. २०१९ मध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रमेश गजबे यांनी १,११,४६८ इतकी मते घेतली होती. यावेळी वंचित'ने नवा चेहरा दिला आहे. बहुजन समाज पार्टीनेही उमेदवार दिला असला, तरी खरा सामना भाजप-काँग्रेसमध्येच होईल,असे चित्र आहे.

नागपूर, रामटेक भंडारा- गोंदिया गडचिरोली -चिमूर चंद्रपूर

भंडारा-गोंदिया
भंडारा-गोंदियात विद्यमान खा. असलेले भाजपचे उमेदवार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातच सामना आहे. बसपाने मते खाऊ नयेत, याकडे दोघांचे लक्ष आहे.

नागपुरात 'बिग फाइट'
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी व काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यामध्ये नागपूर • लोकसभा मतदारसंघात 'बिग फाइट' होत आहे. गेल्यावेळी नाना पटोले यांचा पराभव झाला व गडकरी २ लाख १६ हजार मतांनी विजयी झाले होते. पटोले बाहेरचे असूनही त्यांनी चार लाखांवर मते घेतली होती.

गडकरीचे प्रचारातून अगदी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू • आहेत. तर काँग्रेस एकदिलाने रिंगणात उतरली आहे. या मतदारसंघात वंचितने ठाकरे यांना पाठिंबा दिला असला, तरी त्यांची मते कुठे वळणार, याबद्दल तर्क-विर्तक लढविले जात आहेत.

चंद्रपुरात चुरस
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसला विजय देणारा एकमेव चंद्रपूर मतदारसंघ यावेळीही लक्षवेधी आहे. काँग्रेसच्या आ. प्रतीभा धानोरकर यांची लढत भाजपचे मंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्याशी आहे. गेल्यावेळी वंचितने तब्बल लाखांवर मतांचे विभाजन घडवूनही दिवंगत बाळू धानोरकर यांचा ४४ हजार ७६३ मतांनी विजय झाला होता. यावेळी वंचितचे राजेश बेले रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसने ही लढत प्रतिष्ठेची केल्याने चुरस वाढली आहे.

रामटेकच्या गडावर महाभारत
-रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमदेवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने त्यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे महाआघाडीच्या वतीने रिंगणात आहेत. महायुतीमध्ये शिदेसेनेकडे गेलेल्या या मतदारसंघात भाजपच्या पुढाकारातून काँग्रेसचे आमदार राजू पारवे उमेदवार आहेत.
-  माजी मंत्री सुनील केदार यांची कोंडी करण्यासाठी आमच्या आमदाराला फोडले, असा आरोप करीत काँग्रेस जिद्दीने रिंगणात उतरली आहे.
- बसपाकडून जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, तर वंचित बहुजन आघाडीकडून शंकर चहांदे रिंगणात आहेत. काँग्रेसचे किशोर गजभिये यांनी बंडखोरी करून अर्ज कायम ठेवला आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Eastern Vidarbha will have a thorny fight, even if it is a straight match...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.