नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी, भाजप-शिंदेसेनेची अखेरच्या क्षणी युती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:36 IST2025-12-31T12:34:22+5:302025-12-31T12:36:12+5:30
Nagpur : महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ची आघाडी शेवटच्या क्षणी तुटली व काँग्रेसने सर्व १५१ जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले, तर दुसरीकडे भाजप-शिंदेसेनेमधील जागावाटपाची कोंडी फुटली व दोन्ही पक्षांत युती झाली.

Disruption in Mahavikas Aghadi in Nagpur, BJP-Shinde Sena alliance at the last minute
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ची आघाडी शेवटच्या क्षणी तुटली व काँग्रेसने सर्व १५१ जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले, तर दुसरीकडे भाजप-शिंदेसेनेमधील जागावाटपाची कोंडी फुटली व दोन्ही पक्षांत युती झाली. भाजपकडून ७० टक्के, तर कांग्रेसने ८० टक्के नवीन चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे.
नागपूर महाविकास आघाडी व महायुतीचे काय होणार याचा सस्पेन्स अखेरपर्यंत कायम होता. भाजप व शिंदेसेनेची बोलणी जागावाटपावरच अडली होती. मात्र अखेर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या घरी सोमवारी रात्री बैठक झाली व त्यात शिंदेसेनेला आठ जागा देण्याबाबत निश्चिती झाली. त्यातील सहा जागांवर भाजपचेच उमेदवार आहेत.
त्यामुळे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पंचशील चौकात आंदोलनदेखील केले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसने (अजित पवार) अगोदरच स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जवळपास पक्की झालेली आघाडी अखेर शेवटच्या रात्री तुटली.
उत्तर नागपूर मतदारसंघातील एकही जागा सोडण्यास काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत राऊत यांचा विरोध असल्याचे सांगत काँग्रेसकडून आघाडी करण्यात येत नसल्याचा निरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीने सावध होत सकाळी तब्बल ७९ उमेदवारांना एबी फॉर्म दिले. विशेष म्हणजे काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या बहुतांश उमेदवारांना हेरून राष्ट्रवादीने तिकीट दिले.